बेंगळुरू: केजीएफ या चित्रपटामुळे कन्नड अभिनेता यश हा ‘पॅन इंडिया’ स्टार बनला. यशचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘केजीएफ 3’ या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरही यशचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर अनेकदा तो पत्नी आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो पोस्ट करतो. यश आणि त्याची पत्नी राधिक पंडित यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.
यश आणि राधिकाची पहिली भेट एका टिव्ही शोच्या सेटवर झाली होती. 2004 मध्ये नंदगोकुला या टीव्ही शोच्या सेटवर दोघं भेटले होते. या पहिल्या भेटीत राधिकाला यश अहंकारी वाटला. कारण तो तिच्याशी एका शब्दाने बोललाच नव्हता. शूटसाठी दोघांना एकाच गाडीत बसून जावं लागलं होतं.
या भेटीगाठीदरम्यान दोघं हळूहळू एकमेकांशी बोलू लागले होते. राधिकाशी मैत्री करण्यासाठी यशने थोडा वेळ घेतला. मात्र नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हे प्रेम त्याने राधिकासमोर व्यक्त केलं नव्हतं. बोलता-बोलता अनेकदा त्याने राधिकासमोर प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला याची जराशी कल्पना नव्हती की, यश तिच्यावरच प्रेम करतो.
यश राधिकाला सांगायचा की तो एका मुलीवर खूप प्रेम करतो. त्यावर राधिका त्याला प्रपोज कसं करायचं, तिच्यासमोर प्रेम कसं व्यक्त करायचं याचे टिप्स द्यायची. अखेर एका व्हॅलेंटाइन डेला यशने राधिकाला प्रपोज करण्याचं ठरवलं. मात्र त्याचा हा प्लॅन फ्लॉप ठरला.
व्हॅलेंटाइन डेला यशने राधिकाला फोन करून तिच्या प्लॅनबद्दल विचारलं. राधिकाने त्याला सांगितलं की सिनेमा बघायला जाणार आहे. मात्र त्यावेळी मैत्रीचं नातं तुटू नये यासाठी यशने तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं नाही. राधिका जिथे सिनेमा बघायला गेली होती तिथेच यशसुद्धा पोहोचला होता.
यशने भेटवस्तू आणि कार्ड खरेदी करून राधिकाच्या गाडीत ठेवलं होतं. राधिकाला हे माहीत होतं की यशनेच ती भेटवस्तू गाडीत ठेवली होती. मात्र त्यावेळी दोघं एकमेकांशी काहीच बोलले नाही. त्यानंतर यशने राधिकाला फोन करून आपल्या मनातली गोष्ट सांगितली.
यशच्या प्रपोजलनंतरही राधिकाने त्याला होकार दिला नव्हता. सहा महिन्यांनंतर तिने यशच्या प्रेमाचा स्वीकार केला. या दोघांनी 9 डिसेंबर 2016 रोजी बेंगळुरूमध्ये लग्नगाठ बांधली. यश आणि राधिकाला यथार्थ हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे.