मुंबईच्या भरपावसात ‘रॉकी भाई’ची पत्नीसोबत डेट; पहा व्हिडीओ
'केजीएफ' स्टार यश नुकताच मुंबईत आला होता. आगामी 'रामायण' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो पत्नीसोबत मुंबईला आला होता. बुधवारी संध्याकाळपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसात यश त्याच्या पत्नीसोबत डिनर डेटला गेला होता.
‘केजीएफ’ फेम कन्नड अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईला आला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी राधिका पंडितसुद्धा होती. शूटिंगनंतर मिळालेला वेळ यशने त्याच्या पत्नीसोबत घालवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी मुंबईतील धुआंधार पावसादरम्यान यश आणि राधिका डिनर डेटला गेले. यावेळी एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. पत्नीचा हात हातात घेऊन यश रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला. काही पापाराझी अकाऊंट्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
यशला पाहताच पापाराझी त्याला ‘रॉकी भाई’ आणि ‘अण्णा’ म्हणून हाक मारू लागले. तेव्हा यशसुद्धा त्यांच्याकडे पाहून अभिवादन करतो. यानंतर यश आणि राधिका फोटोसाठी पोझ देतात आणि तिथून बाहेर पडतात. यश त्याच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगनिमित्त मुंबईत आल्याचं कळतंय. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकंच नव्हे तर तो या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकीही एक आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे.
View this post on Instagram
प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ: चाप्टर 2’ हा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. यश हा कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. ‘नंदगोकुला’ या कन्नड टीव्ही शोच्या सेटवर त्याची राधिकाशी भेट झाली होती. याच सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी ‘मिस्टर अँड मिसेस रामचारी’, ‘संतू स्ट्रेट फॉरवर्ड’, ‘मोग्गिना मनसू’ आणि ‘ड्रामा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही एकत्र काम केलंय. यश आणि राधिकाने डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं. या दोघांना आर्या आणि यथर्व ही दोन मुलं आहेत. यशचा ‘केजीएफ: चाप्टर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यामध्ये त्याच्यासोबत संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.