Khatron Ke Khiladi 13 विजेत्याचं नाव लीक; यंदा एक नव्हे तर दोन स्पर्धक ठरले रनर-अप
‘खतरों के खिलाडी 13’ हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून नुकताच त्याचा ग्रँड फिनाले शूट करण्यात आला. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी होतात आणि त्यांना दर आठवड्याला वेगवेगळे स्टंट्स परफॉर्म करायला दिले जातात. यंदाच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकाने बाजी मारली, त्याचं नाव समोर आलं आहे.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेला ‘खतरों के खिलाडी 13’ हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून येत्या 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना तो पहायला मिळणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोण विजेता ठरणार, याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. टॉप 3 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांची नावंही सध्या चर्चेत आहेत. मागच्या एपिसोडमध्ये टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने सर्वांनाच टक्कर देत ‘तिकिट टू फिनाले’वर आपलं नाव कोरलं होतं. तिचा परफॉर्मन्स पाहून रोहित शेट्टीसुद्धा थक्क झाला होता. खतरों के खिलाडीच्या यंदाचा सिझनचा विजेता कोण ठरला, याची माहिती समोर आली आहे.
‘सियासत डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, डिनो जेम्सने यंदाच्या सिझनचं विजेतेपद जिंकलं आहे. तर ऐश्वर्या शर्मा आणि अर्जित तनेजा हे फर्स्ट आणि सेकंड रनरअप ठरले आहेत. टॉप 3 मध्ये हे तिघं पोहोचले होते. त्यांनी अर्चना गौतम, रश्मीत कौर आणि नायरा बॅनर्जी यांना पछाडलं होतं. मात्र विजेत्याच्या नावाबद्दल अद्याप वाहिनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर खरंच डिनो जेम्सने विजेतेपद पटकावलं असेल, तर त्यात काही नवल नाही. कारण प्रत्येक स्टंट करताना त्याने 100 टक्के प्रयत्न केले आहेत. त्याची जबरदस्त कामगिरी पाहून रोहित शेट्टीने सुरुवातीलाच त्याला फायनलिस्ट म्हटलं होतं.
View this post on Instagram
अर्जित तनेजानेही संपूर्ण शोदरम्यान केलेल्या प्रत्येक स्टंटमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. मात्र या दोघांच्या तुलनेत ऐश्वर्या शर्माने अनेकदा स्टंट्स मधेच सोडून दिले होते. अनेकदा तिने एलिमिनेशनचाही सामना केला होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत तिचा खेळ काही खास नव्हता. मात्र शेवटच्या क्षणी ऐश्वर्याने चांगलाच जोर लावला आणि तिने सर्वांना मात देत तिकिट टू फिनाले आपल्या नावे केलं. खतरों के खिलाडीचा बारावा सिझन तुफान गाजला होता. कारण त्यातील सर्वच स्पर्धक तितके तगडे होते. मात्र यंदाचा सिझन फारसा चर्चेत नव्हता. यामागचं कारण म्हणजे यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक तितके लोकप्रिय नव्हते.