आमिरसोबत लग्न करणारी ही चश्मिश महिला कोण? म्हणत ट्रोल करणाऱ्यांना किरण रावचं सडेतोड उत्तर
आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावने अनेकदा ट्रोलिंगचा सामना केला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. आमिरशी लग्नानंतर अनेकजण तिला म्हणायचे की, ही चश्मिश महिला कोण आहे?
अभिनेता आमिर खानने किरण रावला घटस्फोट दिला असला तरी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. घटस्फोटानंतर किरण आमिरच्या मुलीच्या लग्नात उपस्थित होती. इतकंच नव्हे तर किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं प्रमोशन आमिरने केलं. या दोघांचं नातं अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोलसुद्धा केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण रावने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर पक्षपात अनुभवल्याचं तिने सांगितलं आहे. किरणने 2005 मध्ये आमिरशी लग्न केलं. तेव्हापासूनच अशा ट्रोलिंगची सवय झाल्याचं ती म्हणाली.
सुचित्रा त्यागी यांना दिलेल्या मुलाखतीत किरण म्हणाली, “माझ्याबद्दल लोक काय काय म्हणतात, कोणती टीका करतात हे मला माहीतसुद्धा नाही. कारण मी हे सर्व वाचतच नाही. माझ्या मते तुमचं आयुष्य सुखाने जगण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे. कारण या जगात असे ठराविक लोक असतीलच ज्यांना तुम्ही विचित्र किंवा वेगळे वाटत असाल. आमिर खानने कोणत्या चश्मिश महिलेशी लग्न केलंय, असे कमेंट्स मी ऐकले आहेत. माझ्या तरुणपणी मी अशा ट्रोलिंगला सामोरी गेले आहे. पण माझं स्वतंत्र असं व्यक्तिमत्त्व आणि विचार आहेत. एका मर्यादेनंतर मला अशा गोष्टींनी काहीच फरक पडत नाही.”
“आमिर खानला घटस्फोट दिल्यानंतर माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी लोक अधिकच गॉसिप करू लागले. घटस्फोटानंतर आम्ही इतरांप्रमाणे एकमेकांचा द्वेष करत बसलो नाही. किंबहुना चांगले मित्र म्हणून एकत्र आले, हेसुद्धा अनेकांना खुपलं. स्त्रियांना जाणीवपूर्ण किंवा नकळतपणे अशा संघर्षांसाठी उभं केलं जातं,” असंही ती पुढे म्हणाली. किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित ‘लापता लेडिज’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या चित्रपटाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
किरण रावला डेट करण्याआधी आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरानंतर 2002 मध्ये आमिर आणि रिना विभक्त झाले. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तब्बल 22 वर्षांनंतर किरणने या चर्चांवरही मौन सोडलं. एका मुलाखतीत किरणने स्पष्ट केलं की ‘लगान’च्या शूटिंगदरम्यान ती आमिरशी फार क्वचित बोलली होती. चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर 2004 मध्ये आमिर आणि किरण एकमेकांना डेट करू लागले होते.