आठ वर्षांनी लहान हिंदू अभिनेत्याशी लग्न; रमजानबद्दल मुस्लीम अभिनेत्री म्हणाली “मी एकटीच..”
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंटने तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान हिंदू बॉयफ्रेंडशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किश्वर रमजानबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. हिंदू धर्मात लग्नानंतर ती रमजानचं पालन कसं करते, याविषयी तिने सांगितलं.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम किश्वर मर्चंटने 2016 मध्ये अभिनेता सुयश रायशी लग्न केलं. किश्वर मुस्लीम आणि सुयश हिंदू असल्याने या दोघांचं हे आंतरधर्मीय लग्न होतं. लग्नानंतर किश्वर दोन्ही धर्मांचं पालन करताना दिसतेय. नुकतीच तिने सना खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी किश्वर तिच्या हिंदू सासर आणि रमजानच्या महिन्यात रोजाचं पालन कसं करते, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सना खानसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री होती, मात्र धर्माचं कारण देत तिने काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्र सोडलं आणि मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला. लग्नानंतर ती तिच्या युट्यूब चॅनलवर पॉडकास्ट मुलाखती घेताना दिसते. अशाच एका एपिसोडमध्ये किश्वर पाहुणी म्हणून आली होती.
रमजानच्या महिन्यातील आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना किश्वर म्हणाली, “मी लहान असताना आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहायचो. आमचं घर माहीमच्या दर्ग्याजवळच होतं. त्यामुळे रात्रभर सहरीचं जेवण बनायचं. तो माहौलच वेगळा होता. सहरीसाठी संपूर्ण कुटुंब पहाटे उठायचं. आता सासरीसुद्धा मी रोजाचं पालन करते. पण इथे मी एकटीच पहाटे उठते आणि सहरी करते. कधी कधी तर सहरीशिवाय रोजाचा उपवास करते. आता गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, पण लहानपणीच्या आठवणी खूप चांगल्या होत्या.”




View this post on Instagram
सासरी दोन्ही धर्मांचं पालन करत असल्याचं किश्वरने पुढे सांगितलं. “माझं लग्न जरी हिंदू धर्मात झालं असलं तरी आम्ही ईद, दिवाळी, ख्रिसमस सर्व सोबत सेलिब्रेट करतो आणि हे खूप कमाल आहे. रमजानबद्दल माझ्या मुलाला फारसं काही माहीत नाही. कारण अजून तो खूप लहान आहे. पण त्याला अजान आणि नमाज यांबद्दल माहीत आहे. आजोबांना नमाज पठण करताना तो पाहतो. शुक्रवारी जर त्याचे आजोबा त्याला शाळेत न्यायला आले नाहीत, तर त्याला समजतं की आज नमाज आहे”, असं ती पुढे म्हणाली.
किश्वर आणि सुयशबद्दल बोलायचं झाल्यास, या दोघांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे. किश्वर तिच्या पतीपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. किश्वरने ‘हिप हिप हुर्रे’, ‘एक हसीना थी’, ‘इतना करो ना मुझसे प्यार’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘कैसी ये यारियाँ’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने 2015 मध्ये ‘बिग बॉस’च्या नवव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.