KKBKKJ | पाचव्या दिवशी कमाईचा वेग मंदावला; सलमानचा चित्रपट अजूनही 100 कोटींपासून दूर
सुदैवाने 2 जून रोजी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाआधी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाहीये. त्यामुळे सलमानच्या चित्रपटाकडे कमाईसाठी पुरेसा वेळसुद्धा आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा आज सहावा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने समाधानकारक कमाई केली. मात्र अद्याप ‘भाईजान’च्या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पहिल्या दिवशी 15 कोटींच्या कमाईनंतर ‘किसी का भाई किसी की जान’ने शनिवारी आणि रविवारी दमदार गल्ला जमवला. मात्र पाचव्या दिवसाच्या कमाईत घट झाली. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू अशी कलाकारांची मोठी फौज आहे.
किसी का भाई किसी की जानची कमाई-
शुक्रवार- 15 कोटी रुपये
शनिवार- 25.75 कोटी रुपये
रविवार- 26.61 कोटी रुपये
सोमवार- 10.50 कोटी रुपये
मंगळवार- 7.50 कोटी रुपये
एकूण- 85.34 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, ज्या चित्रपटांची कथा जबरदस्त असते आणि संपूर्ण चित्रपट एक एंटरटेन्मेंट पॅकेज असतो तो चित्रपट दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई करतो. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट सलमानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक नाही. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा गाठू शकेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुदैवाने 2 जून रोजी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाआधी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाहीये. त्यामुळे सलमानच्या चित्रपटाकडे कमाईसाठी पुरेसा वेळसुद्धा आहे.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाची कमाई-
2010 – दबंग – 14.50 कोटी रुपये 2011 – बॉडीगार्ड – 21.60 कोटी रुपये 2012 – एक था टायगर – 32.93 कोटी रुपये 2014 – किक – 26.40 कोटी रुपये 2015 – बजरंगी भाईजान – 27.25 कोटी रुपये 2016 – सुलतान – 36.54 कोटी रुपये 2017 – ट्युबलाइट – 21.15 कोटी रुपये 2018 – रेस 3 – 29.17 कोटी रुपये 2019 – भारत – 42.30 कोटी रुपये 2023 – किसी का भाई किसी की जान – 15.81 कोटी रुपये
सलमानचा हा चित्रपट दोन कारणांसाठी खास मानला जातोय. पहिलं म्हणजे जवळपास तीन वर्षांनंतर सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.