मुकेश खन्ना यांच्यामुळे सोडलं ‘शक्तीमान’? अभिनेत्रीने सोडलं मौन; मागितली माफी
अभिनेत्री किटू अडवाणीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'शक्तीमान' ही मालिका सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं. किटूने सुरुवातीच्या दिवसांतच या मालिकेला रामराम केला होता. आता तिने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली आहे.
‘शक्तीमान’ ही नव्वदच्या दशकातील अत्यंत लोकप्रिय मालिका होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण या मालिकेच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहायचे. 1997 ते 2005 पर्यंत ही मालिका तुफान गाजली. ‘शक्तीमान’ हा देशाचा पहिला सुपरहिरो ठरला आणि त्यातील भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील गंगाधरपासून गीात विश्वासपर्यंतच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र त्यातील एका कलाकाराने सुरुवातीच्या काही दिवसांतच मालिकेला रामराम केला होता. या अभिनेत्रीचं नाव होतं किटू गिडवानी. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत किटूने मालिका सोडण्याच्या निर्णयाचा पश्चात्तापदेखील व्यक्त केला. याविषयी ती म्हणाली, “आम्ही शक्तीमानचं शूटिंग विविध ठिकाणी करायचो. त्यात काही भयानक लोकेशन्ससुद्धा असायचे. त्यावेळी निर्मात्यांकडून खूप अजब-गजब कल्पना होत्या. जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुम्हाला तुमची सर्व स्वप्नं पूर्ण करायची असतात. शक्तीमान ही मालिका मी तेव्हा सोडली, जेव्हा मला वाटलं की कदाचित हा शो माझ्यासाठी बनलेला नाही. माझ्यात काहीतरी वेगळं करण्याची खुमखुमी होती. मला मुख्य भूमिका साकारायची होती. शक्तीमानमधील कॉमेडी सीन्स मला आवडले होते, पण त्याहून अधिक काहीतरी चांगलं करण्याचं माझं स्वप्न होतं.”
‘शक्तीमान’च्या चाहत्यांची माफी मागत किटू पुढे म्हणाली, “मला माफ करा शक्तीमानच्या चाहत्यांनो.. कधी-कधी आपल्याकडून चुका होतात. मला आजसुद्धा माझ्या निर्णयावर पश्चात्ताप आहे. मी किमान 100 एपिसोड्स तरी करू शकले असते. पण ठीके, माणसाकडून चुका होऊन जातात.” या मुलाखतीत किटू अभिनेता मुकेश खन्ना यांच्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. मुकेश यांनी शक्तीमान आणि गंगाधर अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या.
“मुकेश खन्ना हे खूप उत्साही कलाकार आहेत. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे. मला त्यांच्याकडून कधीच कोणता त्रास झाला नाही. त्यांच्याप्रमाणेच मीसुद्धा स्पष्टवक्ती आहे. त्यावेळी तर त्यांना अभिनेत्रींशी व्यवस्थित बोलायलाही जमायचं नाही. मी मालिका सोडल्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटलं असेल. त्यांनी मला कॉल केला नव्हता. पण दिग्दर्शक दिनकर जानी यांनी मला मालिका सोडण्यामागचं कारण विचारलं होतं. पण मुकेश खन्ना यांनी कधीच मला कारण विचारलं नव्हतं. त्यांना दुखावल्याचं मला वाईट वाटतं. मी माझ्याच उत्साहात आणि गोंधळात मग्न होती. म्हणून मीसुद्धा त्यांना कधी कॉल केला नाही”, असं तिने स्पष्ट केलं.