Anant Radhika wedding : अनंत अंबानींच लग्न होणार, त्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये असं काय खास? आतून कसं आहे?
Anant Radhika wedding : आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं लग्न जिथे होणार, त्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. भव्य-दिव्यतेत हे कन्वेंशन सेंटर कुठेही अजिबात कमी नाही. हे कन्वेंशन सेंटर आतमधून कसं आहे? त्याच्यात काय खास आहे? त्या बद्दल जाणून घ्या डिटेलमध्ये.
देशातील प्रसिद्ध औद्योगिक कुटुंब अंबानी यांच्या घरात आज लग्न आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज विवाहबद्ध होणार आहे. या लग्नाची देशात भरपूर चर्चा आहे. या लग्नाचा थाट, व्यवस्था, त्यासाठी येणारे पाहुणे प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतेय. त्याचवेळी अनंत-राधिका यांचं विवाहस्थळ देखील चर्चेत आहे. आधी हे हाय-प्रोफाईल लग्न परदेशात होणार अशी चर्चा होती. पण मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स मधील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे हे लग्न होणार आहे. हजारो पाहुणे आज जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे पोहोचतील. या विवाह स्थळाबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी.
मार्च 2022 मध्ये जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरच उद्घाटन झालं. 1,03,012 चौरस मीटरमध्ये हे जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर पसरलेलं आहे. अनेक मोठी प्रदर्शन, परिषदा, बैठका, लग्न आणि अन्य सामाजिक कार्यक्रम या सेंटरमध्ये होतात. तुमची प्रत्यक्ष उपस्थिती, वर्च्युल तसच हायब्रिड अशा तिन्ही पद्धतीने माणसांना सामावून घेण्याची या सेंटरची क्षमता आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशी वास्तुशास्त्राची उत्तम रचना तुम्हाला इथे पहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय संम्मेलन, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि सांस्कृतीक कार्यक्रम इथे संपन्न होतात. जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरची तशी रचनाच करण्यात आली आहे.
इथे काय-काय आहे?
अत्याधुनिक अशा सोयी-सुविधांनी जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर सुसज्ज आहे. अनेक कन्वेंशन हॉल्स, प्रदर्शनासाठी जागा आणि ऑडिटोरियम सभागृह इथे आहेत. सेंटरमध्ये तीन प्रदर्शन हॉल, दोन कन्वेंशन हॉल, एक बॉलरुम, 25 मीटिंग रुम्स, दोन बिझनेस लाऊंज, रजिस्ट्रेशन हॉल आणि सूटस इथे आहेत. बिझनेस आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टी लक्षात घेऊनच जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरची बांधणी करण्यात आली आहे.
आकर्षण काय?
या कन्वेंशन सेंटरमध्ये कल्चरल सेंटर, जियो वर्ल्ड प्लाझा, जियो वर्ल्ड रेसीडन्स, द क्लब हाऊस, जियो वर्ल्ड गार्डन, जियो वर्ल्ड ड्राइव्ह आणि बे क्लब अस बरच काही यामध्ये आहे. म्युझिकल वॉटर फाऊंटन आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मुंबईतील पहिलं ड्राइव्ह इन थिएटर येथेच आहे. PVR कडून हे थिएटर चालवल जातं. 290 कार्सना सामावून घेण्याची या थिएटरची क्षमता आहे. लोकांना इथे सिनेमाचा आनंद घेता येतो.