“ज्या लंगड्याने बलात्कार केला, त्याचंच नाव..”; कुमार विश्वास यांचा सैफ-करीनावर निशाणा
कवी कुमार विश्वास यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यावर मुलाच्या नावावरून अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सैफ आणि करीनाच्या मोठ्या मुलाचं नाव तैमुर असून यावरून सुरुवातीपासूनच बराच वाद आहे.
कवी कुमार विश्वास हे त्यांच्या कवितांसोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यामुळेच ते तरुणवर्गात खूप लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. रामायणासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने त्यांनी सोनाक्षीवर नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर त्यांनी आता अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मुलाच्या नावावरून केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. “ज्या लंगड्याने भारतात येऊन आई-बहिणींचा बलात्कार केला, त्याचंच नाव मुलाला दिलं”, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. सैफ आणि करीना यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमुर अली खान आहे. या नावावरून सुरुवातीपासूनच वाद सुरू आहे.
कुमार विश्वास हे उत्तर प्रदेशातील मुराबाद इथं एका कार्यक्रमासाठी पोहोचले होते. या कार्यक्रमात ते म्हणाले, “मायानगरीत बसलेल्या लोकांना समजण्याची गरज आहे की देशाला काय हवंय? हे चालणार नाही की पैसे आणि लोकप्रियता इथे भारतातील लोकांकडून घेतलं जाईल आणि जेव्हा मुलंबाळं होतील तेव्हा त्यांची नावं बाहेरून आलेल्या आक्रमणकर्त्यांवरून ठेवलं जाईल. कितीतरी नावं आहेत, रिजवान, उस्मान किंवा इतर कोणतंही नाव ठेवू शकत होते. परंतु हेच एक नाव मिळालं का?”
“ज्या लंगड्या माणसाने (तैमुर) हिंदुस्तानमध्ये येऊन आई-बहिणींसोबत दुष्कर्म केलं, त्या लफंग्याचंच नाव तुमच्या प्रेमळ मुलाचं ठेवण्यासाठी मिळालं का? जर या मुलाला हिरो बनवलं गेलं, तर त्याला खलनायकसुद्धा बनवलं जाणार नाही. लक्षात ठेवा हा भारत आता नवीन आहे”, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता सैफ-करीनावर टीका केली. सैफ आणि करीनाने जेव्हा त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव जाहीर केलं होतं, तेव्हासुद्धा यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
View this post on Instagram
करीना कपूर 2016 मध्ये पहिल्यांदा आई झाली. सैफ अली खान आणि करीनाने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं. या नावावरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली होती. याविषयी करीनाने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “मला वाटतं की कोणत्याही आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये. मला आजही त्या ट्रोलिंगमागचं कारण कळत नाही. कारण कोणालाच इतरांचा अपमान करायचा नसतो किंवा दुखवायचं नसतं. आपल्याला भाषणस्वातंत्र्य आहे, आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य आहे. किमान मला आणि सैफला तरी असंच वाटतं”, असं ती म्हणाली. यावेळी करीनाने तैमुर या नावाचा अर्थ ‘लोह पुरुष’ असा सांगितला होता.
“सैफ त्याच्या शेजारच्या मित्रासोबत लहानाचा मोठा झाला आणि त्याला त्या मित्राचं नाव खूप आवडायचं. त्याचं नाव तैमुर असं होतं. त्यामुळे सैफने म्हटलं होतं की जर मला मुलगा झाला, तर तो माझा पहिला मित्र असेल. मला त्याचं नाव तैमुर असं ठेवायला आवडले. अशा पद्धतीने तैमुर हे नाव सुचलं, कारण सैफच्या पहिल्या मित्राचं नाव तैमुर होतं”, असंही करीनाने स्पष्ट केलं होतं.