एकदा नाही अनेकदा पत्नीची फसवणूक, सत्य कळताच तिने..; अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित टंडन याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. लग्नानंतर पत्नीची एकदा नाही तर अनेकदा फसवणूक केल्याची कबुली त्याने या मुलाखतीत दिली.
‘क्यूँकी सास भी कभी बहु थी’, ‘दिल मिल गए’, ‘ये है मोहब्बतें’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अमित टंडन 2018 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून दूर आहे. अमित त्याच्या मालिकांमुळे सध्या लाइमलाइटमध्ये नसला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत अमितने त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. पत्नी रुबीची एकदा नाही तर अनेकदा फसवणूक केल्याचं त्याने म्हटलंय. यामुळे तिच्यासोबतच्या नात्यात फूट पडल्याचंही त्याने मान्य केलंय.
या मुलाखतीत अमित त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी सिद्धार्थने त्याला प्रश्न विचारला की, “तू तुझ्या नात्यात कधी अप्रामाणिक होतास का?” त्यावर उत्तर देताना अमित म्हणाला, “होय, मी अप्रामाणिक होतो. याला मी शब्दांत कसं मांडू? होय, माझ्या आयुष्यात असे क्षण आले जेव्हा.. (विचार करतो), मी या गोष्टीला आदरपूर्वक मांडण्याचा प्रयत्न करतोय पण हे सांगण्यासाठी कोणताच मार्ग आदरपूर्वक नाही. मी आवेगाला माझ्यावर ताबा मिळवू दिला. त्या क्षणांमध्ये मी माझ्या भूतकाळातील काही भाग पुढे नेऊ दिलं. अर्थातच काही काळापर्यंत तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. पण जेव्हा तिला याबद्दल समजलं, तेव्हा ती पूर्णपणे खचली होती.”
“यामुळे तुमच्या नात्यात फूट पडते आणि कधीकधी तो दुरावा मिटवताही येत नाही. तो फक्त वाढत जातो. मुलंबाळं झाली की आमच्या नात्यात सर्वकाही ठीक होईल, असा आम्ही विचार केला. पण असं काहीच झालं नव्हतं”, अशी कबुली अमितने दिली. अमितने 2007 मध्ये रुबीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या दहा वर्षांनंतर 2017 मध्ये ते विभक्त झाले होते. नंतर 2019 मध्ये अमित आणि रुबी पुन्हा एकदा एकत्र आले होते.
अमितने 2005 मध्ये ‘कैसा ये प्यार है’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. नंतर ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या मालिकांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. 2018 मध्ये ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत त्याने शेवटचं काम केलंय.