“ममता कुलकर्णीने इस्लाम धर्म स्विकारला असता तर वाद झाले असते?”, लक्ष्मी नारायण त्रिपाठींचे खळबळजनक विधान
किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर, डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत ममता कुलकर्णी यांच्या राजीनाम्याबद्दल आणि महामंडलेश्वर झाल्याबाबत वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री ममता कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी महाकुंभमध्ये जाऊन, विधी करून किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. त्यानंतर तिचे नावही बदलले आणि ती यमाई ममता नंद गिरी म्हणून ओळखली जाऊ लागली. या संपूर्ण प्रकरणावर एवढा वाद झाला की अखेर ममताला राजीनामा द्यावा लागला. तिचा राजीनामा स्विकारला गेला नाही आणि त्यानंतर पुढे काय झाले याविषयी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता त्यावर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ममता कुलर्णीसोबत नेमकं काय झालं होतं हे सांगितलं आहे.
महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्या ममता कुलकर्णीबद्दल म्हणाल्या की, ‘ती आता यमाई ममता नंद गिरी आहे. 23 वर्षांच्या आयुष्यात तिने स्वतःला मुख्य प्रवाहातील समाजापासून वेगळे केले होते. अडीच ते तीन वर्षे ती माझ्या संपर्कात होती. त्यामुळे ती मला तिच्या संपूर्ण परंपरा सांगत होती. आणि तिला जुना आखाड्याच्या स्वामींनी दीक्षा दिली होती. कुंभात आल्यावर ती मला भेटली. तेव्हा पुन्हा आमच्यामध्ये संवाद झाला. दुसऱ्या दिवशी ती म्हणाली की खूप सुंदर… आज शुक्रवार आहे… एक अर्धनारीश्वर माझा पट्टाभिषेक करेल आणि मी महामंडलेश्वर होईल यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते. मला माझे जीवन सनातन धर्माच्या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित करायचे आहे. ती आधीच साधक होती. ध्यान करायची. अभ्यास करायची. ती मंत्र वगैरे जपायची.’




‘ममता कुलकर्णीने जर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर?’
अबू सालेमशी असलेले संबंध आणि तिचे ड्रग्ज प्रकरण यावर बोलताना महामंडलेश्वर म्हणाल्या, ‘त्या सर्व गोष्टी खऱ्या असतील. आम्हालाही या सर्व गोष्टी माहीत होत्या. तिची सर्व प्रकरणे आता गेली. सर्व रेड कॉर्नर नोटीस वगैरे निघून गेल्या होत्या. त्यानंतरच आम्ही तिचा पट्टाभिषेक केला. जर गणिका वरच्या स्तरावर गेली आहे तर गंधर्व रूपात असलेल्या कलाकाराने वर का जाऊ नये? जे सनातन धर्म स्विकारण्यासाठी आले आहेत त्यांचा आम्ही तिरस्कार करायचा का? आज मी विचारते की याच ममताजींनी जाऊन इस्लाम स्वीकारला असता, हज- मदिना केली असती तर एवढा विरोध करणारे हे सनातनी लोक काही करू शकले असते का?’
ममता कुलकर्णीने खरच राजिनामा दिला का?
ममता कुलकर्णी यांनी राजीनामा देण्याबाबत आणि पदावरून हटवल्याबद्दल डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी पुढे म्हणाल्या, ‘तुमच्याकडे आमच्या किन्नर मंडळाच्या आखाड्यात, ट्रस्टमध्ये, सोसायटीत कोणतेही पद नाही, तर तुम्ही काय हटवाल? अजयदास ऋषींना त्यांच्या कुकर्मांमुळे आम्ही आधीच दूर पाठवले आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. यमाई ममता नंद गिरी आहे, होती आणि कामय राहील. नंतर त्यांनी राजीनामाही दिला होता. पण हा राजीनामा मागे घेण्यात आला. तो व्हिडीओही सर्वत्र पसरला आणि संपूर्ण समाजात पाहिला गेला. सर्व न्यूज चॅनेलने तो चालवला. त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारला नाही. माझ्यामुळे माझ्या गुरूंना इतका त्रास का व्हावा, याचं दडपण तिच्यावर आलं होतं. कारण तिच्यामुळे वाद निर्माण झाला होता. मला पण वाटलं की ही खूप वाईट गोष्ट आहे.