दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?
'भीमराज की बेटी' या गाण्यामुळे निशा भगत यांनाही प्रसिद्धी मिळाली. (know about nisha bhagat)
मुंबई: ‘भीमराज की बेटी’ या गाण्यामुळे निशा भगत यांनाही प्रसिद्धी मिळाली. गोड गळ्याच्या गायिका म्हणून त्या प्रसिद्द आहेत. खुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही त्यांच्या आवाजाचं कौतुक केलं होतं. निशाताईंनी सांगितेला हा किस्सा त्यांच्याच तोडून ऐका. (know about nisha bhagat)
आणि एचएमव्हीवर संधी मिळाली
निशा भगत यांनी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. थेट एचएमव्हीवर त्यांना गाणं गाण्याची संधी मिळाली. कॅसेटचं नाव होतं ‘बोधामृत’. त्यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर या एचएमव्हीवर नव्या गायकांचं गाणं पास करायच्या. निशाताईंचं गाणं पास करण्याचं कामही त्यांच्याकडे आलं होतं. गाणं प्रचंड आवडल्याने लतादीदींनी त्यांचं गाणं तात्काळ पास केलं. इतकेच नव्हे तर लतादीदींनी निशाताईंचा आवाज सुमधूर असल्याचा अभिप्राय प्रसिद्ध गायक कृष्णा शिंदे यांच्याकडे दिला होता. कारण ‘बोधामृत’ कॅसेट ही कृष्णा शिंदे यांनी काढली होती.
आनंदले मन माझे, त्या लुंबिनी वनी गं, दिसे जिथे वैशाखी पौर्णिमा देखणी गं…
हे गाणं निशाताईंनी गायलं होतं. त्याचीच प्रशंसा लतादीदींनी केली होती. लतादीदींनी केलेलं कौतुक ही आपल्या गाण्याची पावतीच असल्याचं निशा ताई सांगतात.
शाळा आणि गायन पार्ट्या
निशा भगत यांचं यवतमाळ जिल्ह्यातील वेणीकोट हे गाव. त्यांचा जन्म आईच्या माहेरी म्हणजे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचं शिक्षण मुंबईतच इयत्ता दहावीपर्यंत झालं. त्यांची आई आशालता भगत या त्या काळातील घराघरात पोहोचलेल्या गायिका होत्या. त्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत आल्या आणि उल्हासनगरमध्येच स्थायिक झाल्या. निशाताई त्यावेळी अवघ्या सात वर्षाच्या होत्या. आजोबा, आई-वडिलांप्रमाणे निशाताईंनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. आई-वडील आणि भाऊ राजू भगत हे त्यांचे या क्षेत्रातील गुरू. भाऊ राजू आणि बहिण उषा भगत यांनीही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत.
घरात गाण्याचं वातावरण होतं. या वातावरणातच त्या घडल्या. बालपणापासूनच कानावर गाण्याचे संस्कार झाले. आई-वडिलांबरोबर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात वयाच्या सातव्या वर्षी पहिलं गाणं गायलं. त्यानंतर दिवसा शाळा आणि रात्री गायनपार्ट्या असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा गाण्याचा पहिला सामना प्रसिद्ध गीतकार आणि गायक मानवेल गायकवाड यांच्याबरोबर झाला. गायकवाडांबरोबर सामना करताना त्या मनातून प्रचंड घाबरल्या होत्या. पण स्टेजवर येताच मनातील भीती दूर पळाली होती, असं त्या सांगतात.
भीमराज की बेटीचा किस्सा
उमर में बाली भोली भाली, शिल की झोली हूँ, अरे, भीमराज की बेटी मै तो, जयभीमवाली हूँ…
निशाताईंनी वयाच्या 16 व्या वर्षी हे गाणं गायलं. प्रसिद्ध कवी आणि गायक प्रतापसिंग बोदडे यांनी लिहिलेलं हे गाणं होतं. या गाण्यामुळे भीमराज की बेटी म्हणून निशाताईंची महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली. गायक किसन खरात यांच्या मध्यस्थीने त्यांना हे गाणं मिळालं. विशेष म्हणजे शकुंतला जाधव यांनी सर्वात पहिल्यांदा हे गाणं गायलं होतं. त्यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्डही झालं आहे. त्यानंतर निशाताईंनी हे गाणं गायलं. त्यानंतर अनेक गायिकांनी हे गाणं गायल्याचं त्या सांगतात. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about nisha bhagat)
संबंधित बातम्या:
‘बाबासाहेब जिंदाबाद’साठी पत्नीने अंगावरचे दागिने मोडले; वाचा, शाहीर कुंदन कांबळेंचा किस्सा
‘तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू…’ हे गाणं तुम्ही आजही गुणगुणता; कुणी लिहिलंय माहित्ये?
संगीतकार पाठक म्हणाले, कसले कवी?, चार ओळी लिहिता येत नाही? आणि ‘हे’ लोकप्रिय गाणं जन्माला आलं
(know about nisha bhagat)