नवी दिल्ली : काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गेल्या वर्षी 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाबमधील मनसा जिल्ह्यात सिद्धूच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि त्याच्यावर अंधाधूंद फायरिंग झाली होती. या फायरिंगमध्य सिद्धूच्या शरीरावर असंख्य गोळ्या लागल्या आणि त्याचा जागीत मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी कुख्यात बिश्नोई गँगचं नाव समोर आलं होतं. मात्र आता या गँगच्या लॉरेन्स बिश्नोईने सिद्धूच्या हत्येमागचं गुपित उघड केलं आहे.
गोल्डी ब्रारने सिद्धू मूसेवालाची हत्या केली, असा खुलासा लॉरेन्सनं केला. “मला हत्येविषयी आधीच समजलं होतं. मात्र त्यात माझा हात नव्हता. मूसेवालाची हत्या गोल्डी ब्रारने केली होती. त्यासाठी जवळपास एक वर्षापासून प्लॅन सुरू होता. मूसेवाला आमच्या विरोधातील गँगला मजबूत करत होता. त्यावरून गोल्डीने म्हटलं होतं की हा आपला शत्रू आहे. मी विक्की मिड्डूखेडाच्या हत्येमुळे नाराज होतो आणि त्या हत्येत मूसेवालाचा हात होता. तो विक्की मिड्डूखेडाच्या मारेकरूंना पाठिंबा देत होता”, असं तो म्हणाला.
गँगस्टरने पुढे सांगितलं, “पोलीससुद्धा मूसेवालाच्या प्रभावाखाली येऊन काम करायचे. त्याने काँग्रेस पक्षात यासाठी प्रवेश केला होता कारण त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी होते. सिद्धूच्या हत्येची प्लॅनिंग गोल्डी आणि सचिनने केली होती. माझा त्यात काहीच हात नव्हता. मात्र मला हे सर्व माहीत होतं. मला याविषयी सर्वांत आधी समजलं होतं.”
विक्की मिड्डूखेडाच्या हत्येमुळे मूसेवालाचा काय फायदा झाला, असा प्रश्न विचारला असता बिश्नोई म्हणाला, “कदाचित मूसेवालाला गँगस्टर बनायचं होतं. त्याला त्याची गाणी खरी करायची होती. मला त्याच्या गाण्यांमुळे काहीच त्रास नव्हता. गुरलाल आणि विक्की मिड्डूखेडाच्या हत्येपूर्वीही मला मूसेवालाशी काहीच समस्या नव्हती. त्याच्याआधी तो गनमॅनशिवाय चंदीगडमध्ये फिरायचा. मात्र आम्ही तेव्हा त्याच्या हत्येचा प्रयत्न केला नाही. मात्र विक्की मिड्डूखेडाच्या हत्येचा माझ्यावर फार परिणाम झाला.”
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 2018 मध्ये त्याने जेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.