Salman Khan | “त्याचा अहंकार मोडल्याशिवाय राहणार नाही”, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईची धमकी
"आमच्या समाजात राग होता. त्याने आमची माफी मागावी, अशी आमची इच्छा होती. त्याच्याविरोधात लहानपणापासून माझ्या मनात राग आहे. कधी शक्य झालं तर त्याला त्याच्याच हिशोबाने उत्तर देऊ", अशी धमकी त्याने दिली.
नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने काही वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खानला धमकी दिली होती. काळवीट हत्येप्रकरणी अडकलेल्या सलमानला धमकी दिल्यामुळे बिश्नोई चर्चेत आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लॉरेन्सने पुन्हा एकदा सांगितलं की सलमानने त्यांच्या समाजाची माफी मागायला हवी. त्यानंतर त्याने धमकीच्या स्वरात म्हटलं की सलमानला त्याच्याच हिशोबाने उत्तर देणार. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सलमान खानविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
सलमानला धमकी देण्याविषयीच्या प्रश्नावर बिश्नोई म्हणाला, “मी तिथे आपले विचार मांडले होते. कधी अपराध करायचा असेल तर तेही करू. आमच्या समाजात त्यांच्याविरोधात खूप राग आहे. आमच्या समाजाला त्याने खूप कमीपणा दाखवला. त्याने कधीच आमच्या समाजाची माफी मागितली नाही. इतक्या वर्षांपर्यंत त्याच्यावरचा खटला चालला.”
“जिथे आम्ही झाडं कापत नाही, तिथे त्याने शिकार केली”
“आम्ही आमच्या परिसरात जीव हत्या करू देत नाही, वृक्ष कापू देत नाही. त्याने आमच्या परिसरात येऊन, जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त होती, तिथे येऊन शिकार केली. आमच्या समाजात राग होता. त्याने आमची माफी मागावी, अशी आमची इच्छा होती. त्याच्याविरोधात लहानपणापासून माझ्या मनात राग आहे. कधी शक्य झालं तर त्याला त्याच्याच हिशोबाने उत्तर देऊ”, अशी धमकी त्याने दिली.
यावेळी लॉरेन्स बिश्नोईने काही महिन्यांपूर्वी सलमान खानला धमकीची चिठ्ठी पाठवल्याचा आरोप फेटाळला. मी कोणतीच चिठ्ठी पाठवली नाही, त्यात माझा काहीच हात नाही हे मी मुंबई पोलिसांनाही सांगितलं होतं, असं त्याने स्पष्ट केलं.
“सलमानला ठोस उत्तर देणार”
मुलाखतीदरम्यान लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ठोस उत्तर देण्याबाबत वक्तव्य केलं. “आमच्या समाजाने जर त्याला माफ केलं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने कारवाई करू. आम्ही कोर्ट किंवा इतर कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहणार नाही”, असा इशारा त्याने दिला.
सलमानने त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांची माफी मागावी, अशीही मागणी बिश्नोईने केली. “बिकानेरच्या पुढे नौखा तहसीलमध्ये आमचं मंदिर आहे. तिथे येऊन त्याने माफी मागावी. जर त्याने माफी मागितली नाही तर आम्ही त्याचा अहंकार मोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी नाही तर विनंती आहे. सलमानला माझ्या गँगकडून कोणताच धोका नाही. माझी इतकीच मागणी आहे की त्याने आमच्या समाजाला संतुष्ट करावं”, असं त्याने स्पष्ट केलं.