कलाविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन
सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन; कलाविश्वाला मोठा धक्का...
K Vishwanath Passed Away : तेलुगू आणि हिंदी सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ (K Vishwanath) यांचं निधन झालं आहे. के विश्वनाथ यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते विश्वनाथ यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. के विश्वनाथ हे वयाशी संबंधित समस्यांशी लढत होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सध्या सर्वत्र त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
के. विश्वनाथ याचे हिंदी सिनेमे
के. विश्वनाथ यांनी अनेक हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘संजोग’, ‘सुर सरगम’, ‘कामचोर’, ‘जाग उठा इंसान’, ‘संगीत’ यांसारख्या सिनेमांचं के.विश्वनाथ यांनी दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले हिंदी सिनेमे हे त्यांच्याच तेलुगू सिनेमांचे रिमेक होते. ‘यारादी नी मोहिनी’, ‘राजापट्टाई’, ‘लिंगा’ आणि ‘उत्तम विलेन’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वच्या भूमिका साकारल्या आहेत.
के. विश्वनाथ यांनी ‘आत्मा गोवरवम’ सिनेमातून दिग्दर्शक म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. ‘आत्मा गोवरवम’ सिनेमासाठी के. विश्वनाथ यांना बेस्ट फिचर फिल्मसाठी नांदी पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. ‘शंकरभरणम’ सिनेमाच्या यशानंतर त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखू जावू लागलं. आज देखील त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातं.
के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (२०१६) सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर १९९२ मध्ये के. विश्वनाथ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे सहा दशकांच्या करियरमध्ये के.विश्वनाथ यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.
एवढंच नाही तर, के.विश्वनाथ अनेकांच्या प्रेरणास्ठानी होते. अभिनेते कमल हासन के.विश्वनाथ यांना गुरु मानायचे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कमल हासन यांनी के.विश्वनाथ यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. आता के.विश्वनाथ यांच्या निधनामुळे चाहत्यांसह कलाकारांच्या मनात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करुन कलाविश्वात आपलं स्थान पक्क करणाऱ्या के. विश्वनाथ यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाल्यामुळे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.