एखाद्याला विहिरीत उडी मारायचीच असेल तर..; सोनाक्षीबद्दल काय म्हणाला होता भाऊ?
सोनाक्षी आणि झहीरने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर त्यांनी भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा तर दिसले. मात्र सोनाक्षीचे सख्खे भाऊ लव आणि कुश कुठेच दिसले नव्हते.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी प्रियकर झहीर इक्बालशी लग्न केलं. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी नोंदणी पद्धतीने हे लग्न केलं. या लग्नावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहेत. मुस्लीम मुलाशी लग्न करत असल्याने सोनाक्षीच्या घरात तिच्याविरोधात नाराजी असल्याचं म्हटलं जातं होतं. अशातच तिचा सख्खा भाऊ लव सिन्हा हा लग्नाला उपस्थित नव्हता. त्याच्या गैरहजेरीमुळे या चर्चा आणखी तीव्र झाल्या होत्या. सोनाक्षीच्या लग्नाच्या सात दिवसांनंतर लव सिन्हाने त्यामागचं कारण सांगितलं. काही लोकांशी मला कधीच संबंध ठेवायचे नाहीत, असं तो म्हणाला होता. इतकंच नव्हे तर त्याने सोनाक्षीच्या सासऱ्यांविरोधातही ट्विट केलं होतं. हे ट्विट त्याने थोड्या वेळानंतर डिलिटसुद्धा केलं. आता लव सिन्हाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
जेव्हा सोनाक्षी आणि झहीरच्या नात्याविषयी चर्चा होत्या, त्यावेळी लव सिन्हाला एका मुलाखतीत बहिणीच्या अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. बहिणीबद्दलच्या अशा चर्चांना तू कशा पद्धतीने हाताळतोस, असा प्रश्न विचारला असता सोनाक्षी माझं ऐकत नाही, असं उत्तर लव सिन्हाने दिलं होतं. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत सोनाक्षीच्या नात्याबद्दल लवने बरंच काही म्हटलं होतं. लवचा हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे.
View this post on Instagram
सोनाक्षीच्या अफेअरवर प्रतिक्रिया
यामध्ये तो म्हणतोय, “एक भाऊ म्हणून मी नेहमीच दुसऱ्या व्यक्तींची काळजी करेन. कारण प्रत्येकजण नेहमी हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो चांगला आहे. ते स्वत:ला एका निश्चित स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र सत्य यापेक्षा खूप वेगळं असू शकतं. एक भाऊ म्हणून मी प्रत्येकावर लक्ष ठेवण्याचं कर्तव्य निभावेन. मी असंच करतो.” सोनाक्षीच्या बाबतीत तो ‘पझेसिव्ह’ आहे का असाही प्रश्न लव सिन्हाला विचारण्यात आला होता.
काय म्हणाला होता लव सिन्हा?
या प्रश्नाचं उत्तर देताना लव पुढे म्हणाला, “मी पझेसिव्ह नाही. मी फक्त तेच म्हणणं पसंत करतो जे मला वाटतं. ही गोष्ट वेगळी आहे की ती माझं ऐकत नाही. ती जशी आहे, तशीच आहे. ती ऐकत नाही, पण मी अशा ठिकाणाहून आलोय, जिथे मला कोणत्याच गोष्टीपासून काही फायदा नाही. बाहेरच्या लोकांचा फायदा होऊ शकतो, बाहेरच्या लोकांचा नेहमीच अजेंडा असतो. मी फक्त एक मोठा भाऊ म्हणून विचार करतोय. एक भाऊ म्हणून मला तिची काळजी असते. त्याच काळजीपोटी मी तिला सल्ला देतो. पण तिला ते ऐकायचं नसेल तर बाकी सगळं तिच्यावर आहे. फक्त चिंता आणि काळजीपोटी मी असं करेन. तरीही जर एखाद्याला विहिरीत उडी मारायचीच असेल तर ती व्यक्ती तसं करू शकते. हे फक्त मी सोनाक्षीच्याच बाबतीत नाही तर सर्वसामान्यपणे म्हणतोय.”