प्रियांका-निकच्या वयातील 10 वर्षांच्या अंतराबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या मधू चोप्रा
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. या वयातील अंतराबद्दल प्रियांकाची आई मधू चोप्रा पहिल्यांदाच व्यक्त झाल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या काय म्हणाल्या, ते वाचा..
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018 मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. प्रियांका आणि निक हे इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. या दोघांच्या लव्ह-स्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते तर उत्सुक होतेच, पण त्यांच्या वयातील फरकानेही सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली होती. प्रियांका आणि निक यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. प्रियांका सध्या 41 वर्षांची तर निक 31 वर्षांचा आहे. आता प्रियांकाची आई मधू चोप्रा या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या वयातील फरकाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत मधू चोप्रा यांनी सांगितलं की प्रियांका आणि निक यांच्यातील वयातील फरक हा कुटुंबात कधी चर्चेचा विषयच बनला नव्हता. वयातील फरकापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयी असणारी काळजी आणि आदर, असं त्या म्हणाल्या.
मधू चोप्रा पुढे म्हणाल्या, “आम्हाला त्यांच्या वयामुळे काहीच फरक पडला नाही. मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, दोघं एकमेकांची काळजी घेतात, आदर करतात.. यापेक्षा अधिक काय पाहिजे? किंबहुना आमच्यात कधी त्याविषयी चर्चादेखील झाली नव्हती. मी त्या दृष्टीकोनातून या गोष्टीकडे पाहिलंच नाही. मी खूप खुश होते. बाकी ज्यांना बोलायचं असेल त्यांना बोलून राहू द्या.” या मुलाखतीत मधू यांनी निकसोबतच्या भेटीचा एक किस्सासुद्धा सांगितला. जेव्हा प्रियांका कामात व्यग्र होती, तेव्हा निक मधू यांना जेवायला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने मधू यांना त्यांच्या मुलीसाठी कसा मुलगा हवा, याविषयी विचारलं होतं.
View this post on Instagram
“जेव्हा तो भारतात आला आणि मला भेटला, तेव्हा प्रियांका कामात बिझी असल्याने तो मला लंचला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने मला विचारलं होतं की मला माझ्या मुलीसाठी कसा मुलगा हवा आहे? तेव्हा मी त्याला सर्व गुण सांगितले. ते ऐकून निकने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला, मी तसाच मुलगा आहे. मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकतो का? मी तुम्हाला वचन देतो की जे गुण तुम्ही मला आता सांगितले, त्याकडे मी कधीच दुर्लक्ष करणार नाही”, असं मधू यांनी सांगितलं.
प्रियांका आणि निकने 1 डिसेंबर 2018 रोजी ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. निकने सर्वांत आधी 2016 मध्ये ट्विटरवर प्रियांकाला मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली. 2017 मध्ये दोघं समोरासमोर पहिल्यांदा भेटले होते. 15 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निकने सरोगसीच्या माध्यमातून चिमुकल्या पाहुणीचं स्वागत गेलं. मालती मेरी असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.