‘चक धूम धूम’ गाण्यावर माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ
'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'चक धूम धूम' गाण्यावर माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरने जबरदस्त डान्स केला आहे. करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्सचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर या जोडीने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. ज्या भूमिकेला साकारण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी नकार दिला होता. तीच भूमिका स्वीकारून अभिनेत्री करिश्माने आपली वेगळी छाप सोडली. या चित्रपटातील दोघांच्या डान्सची जुगलबंदीही तुफान हिट ठरली होती. आता तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्री एकमेकींसमोर आल्या आहेत. माधुरी आणि करिश्माने पुन्हा एकदा चित्रपटातील ‘चक धूम धूम’ गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. करिश्माने नुकतीच ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये माधुरी आणि सुनील शेट्टी परीक्षक आहेत.
माधुरी आणि करिश्मा मंचावर एकत्र असताना त्यांचा डान्स पाहण्याची संधी सूत्रसंचालिका भारती सिंहला चुकवायची नव्हती. म्हणून तिने दोघांना ‘दिल तो पागल है’मधील डान्सची जुगलबंदी पुन्हा एकदा करून दाखवण्याची विनंती केली. या डान्सनंतर दोघींनी बॅकस्टेजसुद्धा एक व्हिडीओ शूट केला. ‘चक धूम धूम’ या गाण्यावर त्यांनी डान्स करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘एव्हरग्रीन करिश्मा कपूर’ असं एकाने लिहिलंय. तर ‘माधुरीच बेस्ट आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
View this post on Instagram
1997 मध्ये ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यश चोप्रा यांच्या या चित्रपटात माधुरी आणि करिश्मासोबतच शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटात करिश्मा कपूने निशाची भूमिका साकारली होती. नव्वदच्या दशकात अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र अनेकांनी नाकारल्यानंतर करिश्माने ती स्वीकारली आणि तिच्या दमदार अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. करिश्मा आणि माधुरी या अभिनेत्री आजही सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसोबत त्या विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.