‘गुलाबी साडी’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा कमाल डान्स; मराठी तडका पाहून चाहतेही खुश!
संजू राठोडचं 'गुलाबी साडी' हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान हिट होतंय. या गाण्यावर अनेकांनी रिल व्हिडीओ बनवले आहेत. ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या गाण्यावर डान्स करण्याचा मोह बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही आवरलं नाही.
मुंबई : 15 मार्च 2024 | संजू राठोडच्या ‘नऊवारी साडी’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आता संजूचं नवीन गाणं ‘गुलाबी साडी’ सुपरहिट ठरतंय. “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ” या गाण्याच्या ओळी आणि संपूर्ण गाणं इतकं व्हायरल झालंय की बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितलाही त्यावर डान्स केल्याशिवाय राहवलं नाही. नुकताच माधुरीने या गाण्यावर डान्स केला आहे आणि तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लाल रंगाचा ड्रेस घातलेल्या माधुरीने ट्रेंडमध्ये असलेल्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने या डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
माधुरीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. माधुरीच्या या रिलला इन्स्टाग्रामवर 12.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर 6.67 लाख लाइक्स मिळाले आहेत. हजारो नेटकऱ्यांनी कमेंट करत माधुरीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. माधुरीने याआधीही मराठी गाण्यांवर डान्स केला आहे. एखादं गाणं ट्रेंड होत असेल आणि अनेकांची त्याला पसंती मिळाली असेल तर त्यावर त्या आवर्जून डान्स करतात. म्हणूनच ‘गुलाबी साडी’ या सध्या गाजणाऱ्या गाण्यावर त्यांनी डान्स केला.
माधुरीच्या या व्हिडीओवर ‘गुलाबी साडी’ गाण्यात झळकलेल्या प्राजक्ता घागनेही कमेंट केली आहे. ‘आई गं.. माझ्या आवडत्या अभिनेत्रीने माझ्या गाण्यावर डान्स केला. माझ्या डोळ्यात अक्षरश: पाणी आहे. माधुरी मॅम.. आय लव्ह यू’, असं तिने लिहिलंय. तर ‘मराठी तडका’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘जबरदस्त डान्स’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
संजू राठोडच्या आतापर्यंत प्रत्येक गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आता ‘गुलाबी साडी’ने देखील केवळ एकाच महिन्यात युट्युबवर 11,086,417 व्ह्यूज मिळवले आहेत. तर या गाण्यावर इंस्टाग्रामवर साडेपाच लाखांहून अधिक रिल्स तयार करण्यात आले आहेत. संजू राठोड हा जळगावमधील धानवड तांडा इथला आहे. दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर त्याने डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याला गायनाची खूप आवड होती. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर तुफान हिट ठरलं. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनीही रिल बनवली होती. या पहिल्यावहिल्या यशानंतर संजूने मागे वळून पाहिलंच नाही.