Madhuri Dixit | माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर; आई स्नेहलता दीक्षित यांचं निधन
माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वरळीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वरळीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. माधुरीच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती रिक्कू राकेश यांनी याबद्दलची माहिती दिली. स्नेहलता यांनी त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर माधुरीनेही अंत्यसंस्काराबाबतचा संदेश दिला आहे. ‘माझी प्रेमळ आई स्नेहलता दीक्षितचं आज सकाळी निधन झालं. मुंबईतील वरळी इथल्या स्मशानभूमीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, असं तिने लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या सासूंसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. सोशल मीडियावर त्यांनी दोन कपचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या 90 वर्षीय सासूंनी केलेली ही पेंटिंग. त्यांना मॅक्युलर डिजनरेशन असून त्या नीट पाहूसुद्धा शकत नाहीत. मात्र त्यांच्या मनातून जे बाहेर येतं ते उल्लेखनीय आहे. ती जगातील सर्वांत सुंदर आणि सकारात्मक व्यक्ती आहे. तिच्या प्रतिभेची आठवण म्हणून आम्ही तिचे पेटिंग कपवर छापून घेतले आहेत.’
My 90 yo mother in law paints. She has macular degeneration & can’t see too well.But what comes out of her mind is remarkable.She is the loveliest, most positive person in the world.We had her paintings placed on mugs to remind us of her talent. #SaturdayMood #Saturday #Art pic.twitter.com/AByVqRj5o5
— Dr. Shriram Nene (@DoctorNene) February 25, 2023
माधुरी दीक्षितची पोस्ट
आईच्या 90 व्या वाढदिवशी माधुरीनेही खास पोस्ट लिहिली होती. ‘हॅपी बर्थडे आई. आई ही मुलीची सर्वांत चांगली मैत्रीण असते असं म्हटलं जातं आणि हे पूर्णपणे खरं आहे. आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलंस, मला जी शिकवण दिली ती माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट आहे. तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी मी प्रार्थना करते’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.
View this post on Instagram
माधुरी विविध मुलाखतींमध्येही तिच्या आईविषयी अनेकदा व्यक्त झाली. आईने ज्याप्रकारे मला लहानाचं मोठं केलं, जी शिकवण दिली त्यामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्या स्टारडमचा खासगी आयुष्यावर परिणाम झाला नाही, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. “मी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करत होते, तेव्हासुद्धा आई मला माझ्या रुममधील पसाऱ्यावरून ओरडायची. अशा वातावरणात मी लहानाची मोठी झाले आणि मी सुद्धा अशीच आहे. मी जेव्हा घरी जाते, तेव्हा माझी मुलं आणि माझा पती हेच माझं आयुष्य असतं. काम आणि घर या दोन गोष्टी मला कोणत्याती समस्येशिवाय वेगळ्या करता आल्या,” असं माधुरीने सांगितलं होतं.