Madhuri Dixit | वैवाहिक आयुष्यातील ‘त्या’ समस्यांबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाली माधुरी दीक्षित
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी व्यक्त झाली. श्रीराम नेने हे डॉक्टर आहे. त्यांच्या कामामुळे लग्नानंतर सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले, असं माधुरीने सांगितलं.
मुंबई : बॉलिवूडच्या करिअरमध्ये शिखरावर असताना अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि अमेरिकेला राहायला गेली. गेली बरीच वर्षे हे दोघं मुलांसोबत अमेरिकेत राहत होते. आता काही वर्षांपूर्वीच भारतात परतल्यानंतर माधुरीने पुन्हा इंडस्ट्रीत पुनरागमन केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी व्यक्त झाली. श्रीराम नेने हे डॉक्टर आहे. त्यांच्या कामामुळे लग्नानंतर सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले, असं माधुरीने सांगितलं.
“त्यांच्या शेड्युलसोबत मिळवून घेणं खूप कठीण होतं. दिवस असो किंवा रात्र, किंवा कधी एका दिवसा आड सतत कॉल यायचे. त्यावेळी ते खूप कठीण होतं, कारण मुलांकडे फक्त मला बघावं लागायचं. त्यांना शाळेत घेऊन जाणं, घेऊन येणं आणि इतर कामंही मीच करायची. घरात कधी एखादी महत्त्वाची गोष्ट घडायची, पण त्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये असायचे. कधी मी आजारी असले तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये राहून इतर रुग्णांची काळजी घ्यावी लागायची”, असं ती म्हणाली.
पतीचं व्यग्र वेळापत्रक असलं तरी त्यात काही सकारात्मक गोष्टीही असायच्या, असं माधुरीने सांगितलं “माझ्यासाठी ती अभिमानाची बाब होती, कारण ते कोणाचा तरी जीव वाचवत आहेत. मला माहीत होतं की ती व्यक्ती मनाने खूप चांगली आहे. लग्नात, तुमच्या पार्टनरला ओळखणं खूप गरजेचं असतं”, असं तिने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाला ‘प्रेमळ प्रवास’ असं म्हणत ती पुढे म्हणाली, “आम्ही एका अशा पार्टनरशिपमध्ये होतो, जिथे आम्ही नेहमी एकमेकांची काळजी घेत होतो आणि मुलांना जेव्हा कधी आमची गरज लागली, तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यात काही कठीण काळही होता, मात्र आम्हा दोघांना हे माहीत होतं की आम्ही जे काही करतोय ते चांगल्यासाठी करतोय आणि आम्हा दोघांनाही हे हवं आहे.”
माधुरीने 1999 मध्ये डॉ. नेनेंशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती अमेरिकेत राहायला गेली. या दोघांना आरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. माधुरीने 2003 मध्ये आरिनला आणि 2005 मध्ये रियानला जन्म दिला. जवळपास दहा वर्षांपूर्वी ती तिच्या कुटुंबीयांसोबत भारतात परतली.