Madhuri Dixit | माधुरी दीक्षितला फक्त ब्रा घालून शूटिंग करण्यास सांगितलं; नकार देताच दिग्दर्शक म्हणाले..
दिग्दर्शक टिनू आनंद यांनी माधुरी दीक्षितचा हा किस्सा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी माधुरीला फक्त ब्रा घालण्यास सांगितलं होतं. त्यावर तिने साफ नकार देताच दिग्दर्शक म्हणाले..
मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : 1980 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कालिया’ आणि ‘शहनशाह’ यांसारखे हिट चित्रपट करणारे टिनू आनंद यांनी एकदा बिग बी आणि माधुरी दीक्षित यांना एका चित्रपटासाठी साइन केलं होतं. 1989 मधला हा ‘शनख्त’ हा चित्रपट होता. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि माधुरी पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. त्यावेळी बिग बी हे इंडस्ट्रीत आधीच स्टार होते. तर माधुरीला ‘तेजाब’ आणि ‘राम लखन’सारख्या चित्रपटांमुळे नुकतीच प्रसिद्धी मिळू लागली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते आणि दिग्दर्शक टिनू आनंद यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा किस्सा सांगितला. पहिल्याच दिवशी कपड्यांवरून त्यांचं माधुरीसोबत भांडण झालं होतं. त्यांनी माधुरीला ऑनस्क्रीन ब्रा घालण्यास सांगितलं होतं आणि त्याला तिने साफ नकार दिला होता.
माधुरी दीक्षितला ब्रा घालून शूट करण्यास सांगितलं
रेडिओ नशाला दिलेल्या या मुलाखतीत टिनू आनंद म्हणाले, “या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना गुंडांनी साखळ्यांनी बांधलेलं होतं. त्यांना माधुरीला वाचवायचं असतं, पण गुंडांसमोर ते अपयशी ठरतात. त्याचवेळी माधुरीने साकारलेली व्यक्तिरेखा त्या गुंडांसमोर म्हणते, एक महिला तुमच्यासमोर उभी असताना तुम्ही साखळ्यांमध्ये बंदिस्त असलेल्या पुरुषावर हल्ला का करताय? हा संपूर्ण सीक्वेन्स मी माधुरीला आधीच सांगितला होता. या सीनमध्ये तिला ब्लाऊजची बटणं काढायची होती. त्यापुढील सीन फक्त ब्रामध्ये शूट करण्यात येणार होता. सुरुवातीला तिने होकार दिला होता.”
माधुरीच्या नकारानंतर बिग बींची मध्यस्ती
“मी माधुरीला इतकंही सांगितलं होतं की तू तुझ्या पसंतीनुसार तो ब्रा डिझाइन करून घे. पण तो ब्राच असला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असता कामा नये. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आम्हाला तो सीन शूट करायचा होता. त्यासाठी मी सेटवर 45 मिनिटांपर्यंत माधुरीची वाट पाहिली. मात्र ती तयारच झाली नव्हती. मी जेव्हा तिला कारण विचारलं, तेव्हा तिने तो सीन करण्यास नकार दिला. मी तिला म्हटलं की तो सीन तुला करावाच लागेल, मी त्यात काहीच बदल करू शकत नाही. त्यावरही तिने नकार दिल्यानंतर मी थेट पॅकअप करण्यास सांगितलं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिला समस्या असेल तर आपण तो सीन रद्द करू असं त्यांनी सुचवलं. मात्र जर का तिला नकार द्यायचाच होता तर चित्रपट साइन करण्याआधी का नाही दिला, असा सवाल मी केला”, असं ते पुढे म्हणाले. या चित्रपटानंतर माधुरी आणि टिनू यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.