मुंबई : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अभिनेत्री टीना घईने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे. ‘गुफी पेंटल यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांची तब्येत बरी नाही’, असं तिने लिहिलं आहे. या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना टीना यांनी सांगितलं की गुफी यांच्या कुटुंबीयांनी अधिक माहिती जाहीर करण्यास मनाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. 31 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा नसल्याचं कळतंय. गुफी यांनी टेलिव्हिजनसोबतच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 1980 च्या दशकात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी ते इंजीनिअर होते. बी. आर. चोपडा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतून त्यांना खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्यांनी शकुनी मामाची भूमिका साकारली होती.
बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. या मालिकेतील भूमिकांसाठी अनेक कलाकारांचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. विशेष म्हणजे शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल हेच मालिकेचे कास्टिंग डायरेक्टरसुद्धा होते. त्यांनीच मालिकेतील इतर कलाकारांची निवड केली होती. महाभारत या मालिकेशिवाय त्यांनी श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. 2010 मध्ये त्यांनी महाभारत मालिकेतील सहअभिनेते पंकज धीर यांच्यासोबत मुंबईत अभिनयाची शाळा उघडली.