Oppenheimer मधील भगवद् गीतेच्या सीनवर ‘महाभारता’तील श्रीकृष्णाची प्रतिक्रिया; म्हणाले “चुकीचा अर्थ..”

| Updated on: Jul 25, 2023 | 1:35 PM

चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान त्याच्या हातात भगवद् गीता पाहून भारतीय प्रेक्षक भडकले आहेत. याच सीनवर आता बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत श्रीकृष्णची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Oppenheimer मधील भगवद् गीतेच्या सीनवर महाभारतातील श्रीकृष्णाची प्रतिक्रिया; म्हणाले चुकीचा अर्थ..
नितीश भारद्वाज यांची 'ओपनहायमर'मधील भगवद् गीतेच्या सीनवर प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : खिस्लोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. 21 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित चित्रपटाने भारतात 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र या चित्रपटातील एका सीनवरून भारतीय प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत. इतकंच नव्हे तर या सीनविरोधात भारत सरकारने दिग्दर्शकाला खुलं पत्रसुद्धा लिहिलं आहे. ‘ओपनहायमर’मध्ये अभिनेता सिलियन मर्फीने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान त्याच्या हातात भगवद् गीता पाहून भारतीय प्रेक्षक भडकले आहेत. याच सीनवर आता बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत श्रीकृष्णची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नितीश म्हणाले, “भगवद् गीता हे युद्धभूमीवर कर्म करण्याच्या भावनेबद्दल आहे. अकराव्या अध्यायातील 32 व्या श्लोकमध्ये अर्जुनाला एक योद्धा असल्याच्या नात्याने त्याचं कर्म करण्यास सांगितलं गेलं आहे. वाईट प्रवृत्तींविरोधात लढणं हे त्याचं कर्म आहे. कृष्णाच्या या संपूर्ण श्लोकाला नीट समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात की मी शाश्वत काळ आहे, जो प्रत्येक गोष्टीला मारू टाकेन. त्यामुळे तू मारलं नाहीस तरी प्रत्येक जण मरणार. म्हणूनच तू तुझं कर्तव्य पार पाड.”

“चित्रपटातील श्लोकाचा वापर चुकीचा नाही”

नितीश भारद्वाज यांनी लोकांना विनंती केली आहे की त्यांनी या संदेशाचा चुकीचा अर्थ काढू नये. “ओपनहायमरने अणुबॉम्ब बनवला आणि त्याचा वापर जपानच्या बहुतांश लोकसंख्येला मारण्यासाठी केला गेला. त्यामुळे ते स्वत:साठी प्रश्न उपस्थित करत होते की त्यांनी आपलं कर्तव्य योग्य रितीने पार पाडलं की नाही? एका लोकप्रिय मुलाखतीत त्यांना रडताना पाहिलं गेलं. याचा अर्थ कदाचित त्यांना त्यांच्या आविष्कारावर पश्चात्ताप झाला असेल. त्यांचा आविष्कार भविष्यात मानवसृष्टीला नष्ट करेल हे त्यांना कळून चुकलं होतं आणि त्याचाच त्यांना पश्चात्ताप होता”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“चित्रपटात भगवद् गीतेच्या या श्लोकाचा वापर करताना ओपनहायमरच्या भावनिक स्थितीलाही समजून घेतलं पाहिजे. शास्त्रज्ञ त्याच्या आविष्काराबद्दल दिवसातील 24 तास, आठवड्यातील 7 आणि वर्षातील 365 दिवस विचार करत असतो. इतर काही काम करत असतानाही तो फक्त त्याच्या आविष्काराबद्दल विचार करत असतो. अशा परिस्थितीत शारीरिक संबंधाची क्रिया ही फक्त नैसर्गिक यांत्रिक क्रिया ठरते”, अशा शब्दांत त्यांनी मत मांडलं.