‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची हॅटट्रीक’चं नवं पर्व; विनोदाचा वाढणार पारा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे आजवर 800 पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून प्रेक्षकांनीही त्यांच्या या आवडत्या कार्यक्रमाला भरपूर प्रेम दिलं आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज-नामवंतांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची नवी पर्वे, त्यातले नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये प्रेक्षकांना नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. तब्बल सहा वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.
येत्या 2 डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- कॉमेडीची हॅटट्रीक’ हे नवं पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या पर्वाचं वैशिष्ट्य काय असणार आहे, याबद्दल कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या. यांतून अनेक पात्रं लोकप्रिय झाली, पण ती पात्रं फक्त त्या-त्या मालिकेमध्ये पाहिली. या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधली पात्रं एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धमाल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहता येईल. यातून नक्कीच मोठा हास्यकल्लोळ निर्माण होईल आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.”
View this post on Instagram
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे म्हणाले, “यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये काही नवनवीन पात्रं पाहायला मिळतील.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लेखक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि आधीच्या विषयांमध्ये नवीन पात्रांचा आणि गोष्टींचा समावेश करून ते सादर करण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे विशेष प्रोमोज प्रेक्षकांना आवडत आहेत.”
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून दिसलेला तिच्यातला मुळातला रांगडेपणा प्रेक्षकांना भावला होता. तोच अभिनय आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यवीरांसह रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी ठसकेबाज भाषा आता हास्यजत्राच्या मंचावर पाहायला मिळेल. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची हॅटट्रीक’ येत्या 2 डिसेंबरपासून सोमवार ते बुधवार रात्री 9.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.