Badlapur News : ‘जबरदस्तीने कपडे स्त्रीचे काढले जातात पण…’, बदलापूर घटनेवर मराठी अभिनेत्याचा संताप
‘मी स्त्री असतो तर’ , ‘स्त्री तुझा जन्म कसा’ असे ‘निबंध’... बदलापूर येथे घडलेल्या घटनेवर मराठी अभिनेत्याने तिव्र शब्दांत व्यक्त केल्या भावना, म्हणाला, 'जबरदस्तीने कपडे स्त्रीचे काढले जातात पण...'
Badlapur News : बदलापूर येथे घडलेल्या घटनेचे पजसाद सर्वत्र उमटलेले दिसत आहेत. 4 वर्षीय आणि 6 वर्षीय मुलींवर त्यांच्याच शाळेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर येताच बदलापूरकर रस्त्यावर उतरले… मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केलं… तब्बल 7 ते 8 तास बदलापूरमध्ये रेलरोको आंदोलन करण्यात आलं. आता ही संतापाची लाट सर्वदूर पसरलेली आहे. यावर सेलिब्रिटी देखील संताप व्यक्त करत आहेत…
शाळेतील स्वच्छचागृहात मुलींवर सफाई कर्मचारी लैंगिक अत्याचार करतो… शाळेकडून सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्यात येतात… पोलीस तक्रार नोंदवायला 11 ते 12 तास लावतात… अशा या कृत्यमुळे संतापलेली जनता आता मुलींच्या हक्कासाठी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पुढे आली आहे.
दरम्यान, महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्रमेश बेटकरने याने व्यवस्थेच्या अवस्थेला पत्र लिहिलं आहे. फेसबूकवर अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बदलापूर याठिकाणी घडलेली घटना आणि अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
अभिनेता श्रमेश बेटकरने याने लिहिलेलं पत्र
व्यवस्थेच्या अवस्थेला पत्र : अप्रिय व्यवस्था,
तुला माहीतच असेल की रेप हा ‘गुन्हा’आहे , पण काही पुरुषांना ते ‘कर्तव्य’ वाटू लागलंय . म्हणूनच रेप ही फॅशन होण्याअगोदर व्यवस्थेने जागं व्हावं .‘बाईचा जन्म नको गं बाई’ इथपासुन सुरु झालेला प्रवास “या देशात जन्म नको गं बाई “ इथे आणून ठेवू नका .. कायदे हे कायदे वाटले पाहिजेत ते चेष्टा वाटू लागली कि मग संपतं सगळं .. ‘अंमलबजावणी’ नावाचा एक मराठी शब्द आहे , व्यवस्थेने तो वाचावा , त्याचा अर्थ मस्त आहे . विकृतांना धाक बसेल अशी पावलं उचलावीत.
‘स्त्रीचा जन्म सन्मानासाठी आहे .. तो तिला मिळालाच पाहिजे आणि त्या सन्मानाचं रक्षण झालं पाहिजे , ती जबाबदारी जितकी समाजाची तितकीच व्यवस्थेची आहे… कारण जबरदस्तीने कपडे स्त्रीचे काढले जातात पण व्यवस्था ‘नग्न’ होते. आणि प्लीज आता आरोपीना ‘मी स्त्री असतो तर’ , ‘स्त्री तुझा जन्म कसा’ असे ‘निबंध’ लिहायला सांगू नका. असं अभिनेता पत्रात म्हणाला आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकरी देखील लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.