12 वर्षांच्या मुलीला शाळेत जाऊ देत नाही महेश बाबू; वडिलांमुळे सिताराला मारावी लागते दांडी
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूची मुलगी सितारा ही 12 वर्षांची असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने शाळेला दांडी मारण्यामागचं कारण सांगितलं आहे. वडिलांमुळे अनेकदा शाळेला दांडी मारावी लागते, असं तिने म्हटलंय.
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टमनेनी हिने वयाच्या 12 व्या वर्षीच बरीच लोकप्रियता मिळवली आहे. इतक्या कमी वयातच ती टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली होती. तर एका मोठ्या दागिन्यांच्या ब्रँडसाठी तिने जाहिरातसुद्धा केली होती. सितारा तिच्या आईवडिलांसोबत विविध कार्यक्रमांनाही उपस्थित राहते. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अशातच सितारा शाळेत कधी जाते, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द सितारानेच असा खुलासा केला आहे की वडिलांमुळे ती बऱ्याचदा शाळा ‘बंक’ करते.
‘आयड्रीम मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सिताराला विचारलं गेलं की ती कधी शाळेला दांडी मारते का? त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझ्या वडिलांमुळे बऱ्याचदा मला शाळेला दांडी मारावी लागते. ज्यादिवशी त्यांना काम नसतं, तेव्हा मला घरी राहता यावं यासाठी आईची मनधरणी करतात. ते तिला कसं समजावतात माहित नाही, पण त्यांच्यामुळे मी शाळेला दांडी मारते. त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूपच मजेशीर असतं. मी त्यांचे सर्व चित्रपट थिएटरमध्ये पाहते. नुकताच मी त्यांचा ‘मुरारी’ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता. प्रत्येकाला माझे वडील हिरो वाटतात. त्यांचे चित्रपट पाहताना मलाही तसंच वाटतं. पण घरी असताना ते फक्त माझे वडील असतात.”
View this post on Instagram
“माझा भाऊ गौतम एखाद्या चित्रपटात हिरोची भूमिका कधी साकारेल, याचीच मी प्रतीक्षा करतेय. त्याने ‘वन: नेनोक्कोडिने’ या चित्रपटातून आधीच पदार्पण केलंय. पण तेव्हा तो लहान होता. तो आता न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाणार आहे आणि तिथे तो चार वर्षे ड्रामाचा कोर्स करणार आहे. तो नक्कीच अभिनेता बनेल. मीसुद्धा अभिनयाच्या क्लासेसना जाते. वर्षभरापूर्वी मला मंचाची खूप भीती वाटायची, पण आता ती नाहिशी झाली आहे”, असंही तिने पुढे सांगितलंय.
सिताराला चित्रपट पहायला आवडतात आणि त्यात अभिनय करण्यात तिला खूप रस आहे. अभिनयाचा हा आत्मविश्वास आईकडून मिळाल्याचं ती म्हणते. आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सितारासुद्धा चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.