‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी..’; महेश मांजरेकरांनी सलमानला म्हटलं ‘देवमाणूस’
अभिनेता सलमान खानसोबत असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना महेश मांजरेकर त्याला 'देवमाणूस' म्हणाले. सलमान आणि मांजरेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. यावेळी त्यांनी सलमानच्या दिलदार स्वभावाचा एक किस्सा सांगितला.

अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सलमान खानसोबत विविध चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. ‘वाँटेड’ (2009), ‘दबंग’ (2010), ‘रेडी’ (2011) आणि ‘बॉडीगार्ड’ (2011) यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघं एकत्र झळकले. या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री असून महेश मांजरेकर अनेकदा त्यांच्या मैत्रीबद्दल मोकळेपणे व्यक्त होतात. आपल्या आगामी ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही त्यांनी पुन्हा एकदा सलमानच्या दिलदार स्वभावाचा किस्सा सांगितला. सलमानने आजवर इंडस्ट्रीत अनेक कलाकारांची खुल्या मनाने मदत केली आहे. म्हणूनच त्याला ‘भाईजान’ असं म्हटलं जातं. महेश मांजरेकरांसोबत काम करण्याआधी एका कठीण काळात सलमानने मदतीचा हात पुढे केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्या या स्वभावाने मांजरेकर भारावले होते.
याविषयी ते म्हणाले, “आम्ही तेव्हा एकत्र कामसुद्धा केलं नव्हतं. मी अत्यंत कठीण काळाचा सामना करत होतो आणि अचानक एकेदिवशी मला सलमानने माझ्या लँडलाइनवर फोन केला. तो मला म्हणाला, काळजी करू नकोस. सर्वकाही ठीक होईल. ते ऐकून मला जणू वाटलं की, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे’ असं तो मला म्हणतोय. तेव्हापासून तो नेहमीच माझ्यासोबत आहे. कधीही मदत लागली तर तो धावून येतो.”
“तो एक माणूस जो कधीच देवमाणूससारखा दिसत नाही, ज्याला मी कधीकधी गृहित धरतो.. तो म्हणजे सलमान खान. मी त्याच्या नावाचा उल्लेख करत नाही, पण तो नेहमीच मदतीला धावून येतो. ही गोष्ट कोणीच बदलू शकत नाही. आम्ही ‘दबंग’मध्ये सर्वांत आधी आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्याच्या बहुतांश चित्रपटांमध्ये मी भूमिका साकारल्या आहेत. आमची मैत्री सहजच झाली आणि का ते मलाही माहीत नाही. तो जे काही करेल, त्याचं कौतुक करणाऱ्या लोकांपैकी मी नाही. पण मी त्याच्यासोबत खूप प्रामाणिक आहे आणि कधीकधी ती एक समस्यासुद्धा बनते. पण मला तो खूप आवडतो म्हणून मी त्याच्यासोबत असा आहे. बाकी लोकं प्रामाणिक नाहीत, त्यांना फक्त त्याच्या जवळ राहायचं असतं”, असंही मांजरेकर म्हणाले.




‘देवमाणूस’ या चित्रपटात रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.