त्याला सावरकर काळे की गोरे हेदेखील माहीत नव्हतं; रणदीपबद्दल महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
मे 2021 मध्ये या प्रोजेक्टची घोषणा करताना महेश मांजरेकरांचा उल्लेख चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून करण्यात आला होता. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी या बायोपिकमधून काढता पाय घेतला. त्यावेळी रणदीप आणि मांजरेकर यांच्यात बरेच मतभेद निर्माण झाले होते.
विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अभिनेता रणदीप हुडाने यामध्ये वीर सावरकर यांची भूमिका साकारली असून त्यानेच याचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. मात्र हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने केवळ 20 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट त्यातील कलाकारांच्या वादामुळे चर्चेत आला होता. कारण महेश मांजरेकर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बायोपिकचं दिग्दर्शन करणार होते. किंबहुना हा मूळ प्रोजेक्ट त्यांचाच होता. पण नंतर रणदीपसोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी काढता पाय घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते यावर मोकळेपणे व्यक्त झाले. चित्रपट सोडण्यामागचं कारण सांगताना त्यांनी रणदीप हुडावरही टीका केली.
“सावरकर काळे की गोरे हेसुद्धा त्याला माहीत नव्हतं”
“वीर सावरकरांचा बायोपिक हा माझा मूळ प्रोजेक्ट होता. त्यासाठी मी निर्माते आणि कलाकारांची जमवाजमव केली होती. त्यावेळी रणदीपला सावरकर काळे की गोरे हेसुद्धा माहीत नव्हतं. सावरकर व्हिलन आहेत असं त्याला आधी वाटलं होतं. नंतर त्याने सगळा इतिहास वाचून काढला होता”, असं मांजरेकर म्हणाले. स्क्रिप्टिंग सुरू असल्यापासूनच रणदीप आणि मांजरेकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. रणदीपने अनेक गोष्टींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, असं मांजरेकांनी सांगितलं. म्हणूनच त्यांनी चित्रपटातून माघार घेतली.
निर्मितीसाठी रणदीपने विकली वडिलांनी कमावलेली संपत्ती
महेश मांजरेकरांना त्यांच्या पद्धतीनुसार चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं होतं. तर रणदीपला त्यात इतरही बऱ्याच घडामोडींचा समावेश करायचा होता. एखाद्या गोष्टीबद्दलचा प्रामाणिकपणा आणि वेड यात फरक असतो असं म्हणत मांजरेकरांनी रणदीपला ‘ऑब्सेसिव्ह’ म्हटलं. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान रणदीपला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. यासाठी त्याने वडिलांची काही संपत्तीसुद्धा विकली होती. सुदैवाने महाराष्ट्रात समाधानकारक कमाई झाल्याने तोटा झाला नाही, असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.
याविषयी रणदीप म्हणाला, “मी माझ्या वडिलांना सांगितलं की हा प्रोजेक्ट मी माझ्या हाती घेतला आहे. लोक आता त्यात पैसे गुंतवायला तयार नाहीत, त्यामुळे हा प्रोजेक्ट रखडू शकतो. मी काय करू? त्यांनी मला लगेच उपाय सांगितला. या चित्रपटासाठी मी त्यांनी मेहनतीने कमावलेली संपत्ती विकली होती. पण त्यांना माझ्या कामावर विश्वास होता. अनेक मध्यमवर्गीय पालक असं करताना घाबरतात. पण त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला.”