रणबीरसोबतचा तो फोटो समोर आल्यानंतर अभिनेत्रीला वाटलं ‘संपलं आता करिअर’, दिवसरात्र ढसाढसा रडली
अभिनेता रणबीर कपूरसोबत या अभिनेत्रीचा न्यूयॉर्कमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. त्या संपूर्ण घटनेवर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतात आणि जगभरातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगभरात तिच्या सौंदर्याचा आणि अभिनयकौशल्याचा मोठा चाहतावर्ग आहे. माहिराने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच आव्हानांचा सामना केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या आयुष्यातील विविध आव्हानांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटीत, एकल मातृत्व, पाकिस्तानातील इतर कलाकारांसोबत तिच्यावरही भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास लावलेली बंदी या सर्व गोष्टींबद्दल तिने मनमोकळी प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीत माहिरा तिच्या करिअरमधील सर्वांत वादग्रस्त ठरलेल्या व्हायरल फोटोचाही खुलासा केला. अभिनेता रणबीर कपूरसोबत तिचा धुम्रपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर आपलं करिअर पूर्णपणे संपल्याची भीती तिला वाटू लागली होती.
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत माहिरा म्हणाली, “तो खूपच चढउतारांचा काळ होता. माझ्या प्रेक्षकांनी माझ्यासोबत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. घटस्फोट, मुलाचं संगोपन, बऱ्याच काळापर्यंत सिंगल म्हणून जगलेलं आयुष्य, स्मोकिंग करतानाचा व्हायरल झालेला तो फोटो, दुसऱ्या देशात कामावर आलेली बंदी.. हे सर्वकाही खूपच आव्हानात्मक होतं. तो काळ खूपच कठीण होता.”
रणबीरसोबत धुम्रपान करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर माहिराला तिचं करिअर संपल्याची भीती सतावत होती. याविषयी ती पुढे म्हणाली, “जेव्हा माझे फोटो व्हायरल झाले, तेव्हा बीबीसीमध्ये ‘द लिटिल व्हाइट ड्रेस’ नावाचा लेख प्रकाशित झाला होता. त्यावेळी मी त्या लेखाचं महत्त्व ओळखण्यात अपयशी ठरले होते. कदाचित मला आता ते समजलंय. मला आठवतंय तो लेख वाचल्यानंतर मी विचार करत होते की माझं करिअर आता संपलंय का? त्या लेखात असं लिहिलं होतं की, पाकिस्तानमध्ये कोणालाही जितकं यश मिळालं नव्हतं तितकं या महिलेनं कमावलं होतं, सर्व जाहिराती.. सर्व काही.. आणि ते सर्वकाही संपलंय. कदाचित 14 वर्षीय माहिराने मला ते सांगितलं होतं. पण मी खोटं बोलणार नाही, तो काळ खूप कठीण होता. मी बेडवरून उठायचेच नाही, मी दररोज रडत बसायचे. माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम झाला होता. माझ्या खासगी आयुष्यात बरंच काही घडलं होतं.”
“वैयक्तिक पातळीवर मी काही योग्य निर्णय घेतले. मी काही वैयक्तिक निर्णय घेतले, जे माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी योग्य होते. व्यावसायिक पातळीवर मी मौन बाळगणं पसंत केलं होतं, कारण त्या घडीला मी काहीच बोलू शकत नव्हते. सर्व ब्रँड्सनी मला फोन करून सांगितलं होतं की आम्ही तुझ्यासोबत आहोत”, असं माहिरा म्हणाली.
2017 मध्ये माहिरा आणि रणबीरचा स्मोकिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दोघं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर धुम्रपान करताना दिसले होते. हा फोटो व्हायरल होताच त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या. त्यावेळी माहिरा आणि रणबीर एकमेकांना डेट करत असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या.