खान कुटुंबाच्या पार्टीत पूर्व सुनेच्या एण्ट्रीने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा व्हिडीओ
अभिनेता सोहैल खानचा मुलगा निर्वाण खान याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत मलायका अरोराच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही दोघांनी मिळून अरहानचं संगोपन केलं. घटस्फोटानंतरही अडीअडचणींच्या काळात दोघं एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहताना दिसले. तर एकमेकांच्या आनंदातही ते खुलेपणाने सहभागी झाले. नुकताच अरबाजचा भाऊ सौहेल खानच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमान खानचा भाचा निर्वाणच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये मलायकाच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
निर्वाण खानच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. फरदीन खान, बॉबी देओल, अयान खान, मुकेश छाबडा, आयुष शर्मा यांच्यासह अभिनेता सलमान खानसुद्धा या पार्टीला आला होता. अशातच खान कुटुंबाची पूर्व सून आणि सलमान खानची पूर्व वहिनी मलायका अरोरासुद्धा अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या पार्टीमध्ये दिसली. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सोहैल आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांचाही घटस्फोट झाला आहे. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. पती-पत्नी म्हणून जरी सोहैल आणि सीमाचं नातं संपुष्टात आलं असलं तरी आईवडील म्हणून दोघं मुलांसाठी एकत्र येताना दिसले.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मलायका अरोराने तिच्या वडिलांना गमावलं होतं. मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरून उडी मारून स्वत:चा जीव संपवला होता. या कठीण काळात मलायकाचा पूर्व पती अरबाज खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब मलायकाच्या पाठिशी खंबीरपणे उभं होतं. खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. इतकंच काय तर अभिनेता सलमान खानसुद्धा मलायकाच्या भेटीला पोहोचला होता. मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर खान कुटुंबाने तिची ज्याप्रकारे साथ दिली, त्याविषयी बोलताना सीमा एका मुलाखतीत म्हणाली होती, “ते (खान कुटुंब) एखाद्या खडकासारखे खंबीर आहेत. जेव्हा एखादं संकट येतं किंवा तुम्हाला कोणतीही गरज असेल तेव्हा ते सर्वजण तुमच्या पाठिशी उभे राहतील. त्यांचा हाच गुण त्यांना एक कुटुंब म्हणून खास बनवतं.”