33 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स; सवाल करताच नेटकऱ्यांना म्हणाली..
अभिनेत्री मालविका मोहनन हिने तिच्या सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 33 वर्षांनी मोठ्या मोहनलाल यांच्यासोबत रोमान्स करण्यावरून काहींनी तिच्यावर टीका केली आहे.

अभिनेत्री मालविका मोहननने 2013 मध्ये ‘पट्टम पोले’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यामध्ये तिने अभिनेता दलकर सलमानसोबत भूमिका साकारली होती. गेल्या बारा वर्षांत मालविकाने 10 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. करिअरमध्ये आतापर्यंत तिने माजिद माजिदी यांसारखे दिग्दर्शक आणि मम्मूटी, रजनिकांत, विजय, धनुष, विक्रम यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलंय. सध्या ती दिग्गज मल्याळम दिग्दर्शक सत्यम अंतिक्कड यांच्या बहुचर्चित ‘हृदयपूर्वम’ या चित्रपटासाठी शूटिंग करतेय. यामध्ये ती सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मालविकाने या शूटिंगदरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. परंतु या फोटोंवरून काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मोहनलाल आणि तिच्या वयातील अंतरावरून काही नेटकऱ्यांनी ही टीका केली आहे.
’65 वर्षीय व्यक्ती ही 30 वर्षीय तरुणीच्या प्रियकराची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ कलाकार त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान कलाकारांसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यासाठी का उत्सुक आहेत,’ असा खोचक सवाल नेटकऱ्यांनी केला. त्यावर आता मालविकाने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘ते प्रियकराच्या भूमिकेत आहेत, असं तुम्हाला कोणी सांगितलं? लोकांबद्दल आणि चित्रपटाबद्दल तुमच्या तथ्यहीन गृहितकांवरून मतं बनवणं थांबवा’, असं तिने लिहिलं आहे. मालविका सध्या 31 वर्षांची असून मोहनलाल हे 64 वर्षांचे आहेत.




View this post on Instagram
याआधी अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना याच कारणामुळे चर्चेत आले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटात रश्मिका आणि सलमान यांचा ऑनस्क्रीन रोमान्स पहायला मिळाला. रश्मिका ही सलमानपेक्षा वयाने 31 वर्षांनी लहान आहे. 31 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याबाबत एकाने सलमानला सवाल केला होता. त्यावर सलमानने त्याच्याच ‘दबंग’ अंदाजात उत्तर दिलं होतं. रश्मिका काय तर भविष्यात तिच्या मुलीसोबतही काम करणार, असं तो म्हणाला होता. “जर हिरोइनला काही समस्या नाही तर मग तुम्हाला का समस्या आहे?” असा सवालही त्याने केला होता. या चित्रपटात सलमान आणि रश्मिकाने पहिल्यांदाच एकत्र काम केलंय.