रस्ते अपघातात आणखी एका अभिनेत्याने गमावला जीव; तीन मिमिक्री आर्टिस्ट जखमी
काही दिवसांपूर्वीच 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत जास्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं रस्ते अपघातात निधन झालं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेली असता तिच्या गाडीचा अपघात झाला होता.
केरळ : रस्ते अपघातात आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. यामध्ये मल्याळम अभिनेता कोल्लम सुधीचं निधन झालं. तो 39 वर्षांचा होता. कोल्लमसोबत तीन मिमिक्री आर्टिस्टसुद्धा प्रवास करत होते. हे तिघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. बिनू आदिमलू, उल्लास आणि महेश अशी तिघांची नावं आहेत. केरळमधील कैपमंगलम याठिकाणी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. काही दिवसांपूर्वीच ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत जास्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं रस्ते अपघातात निधन झालं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेली असता तिच्या गाडीचा अपघात झाला होता.
मिमिक्री आर्टिस्टसोबत कोल्लमचा वटाकारा याठिकाणी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम करून परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. कोल्लमसोबत असलेल्या तीन आर्टिस्टवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
View this post on Instagram
कोल्लम सुधीने 2015 मध्ये चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात केली. दिग्दर्शक अजमल कांतारी यांच्यासोबत त्याने पहिल्या प्रोजेक्टसाठी काम केलं. त्याआधी तो प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट होता. टीव्ही शोज आणि स्टेज शो करत त्याला लोकप्रियता मिळाली. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत कट्टापनायले ऋत्विक रोशन आणि कुट्टनदन मारपप्पा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. चित्रपटांमधील त्याच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या आहेत.
वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू
22 मे रोजी हिमाचल प्रदेश इथं अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं अपघातात निधन झालं होतं. हिमाचल प्रदेशात कुलू इथं फिरत असताना वैभवीच्या गाडीचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावरून जात असताना एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला जागा करून देण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या अगदी कडेला गाडी थांबवली होती. मात्र बाजूने जाताना ट्रकचा धक्का लागल्याने गाडी दरीत कोसळली.