ड्रग्जच्या नशेत त्याने माझा ड्रेस..; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पुन्हा कधीच काम करणार नसल्याचा घेतला निर्णय

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत सेटवर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. त्याचसोबत यापुढे ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कलाकारांसोबत कधीच काम करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ड्रग्जच्या नशेत त्याने माझा ड्रेस..; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पुन्हा कधीच काम करणार नसल्याचा घेतला निर्णय
Malayalam actress Vincy Aloshious
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2025 | 9:23 AM

बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड.. इंडस्ट्री कोणतीही असली तरी ड्रग्जशी संबंधित बातम्या समोर येतच असतात. नुकतंच एका मल्याळम अभिनेत्रीने सेलिब्रिटींच्या ड्रग्ज सेवनाबद्दल धक्कादायक खुलासा केला. विंसी अलोशियस (Vincy Aloshious) असं या अभिनेत्रीचं नाव असून यापुढे ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कलाकारांसोबत कधीच काम करणार नसल्याचं तिने जाहीर केलंय. याबद्दल सांगताना विंसीने तिच्यासोबत घडलेल्या घटना उलगडून सांगितल्या. केरळमधील पल्लीपुरम चर्चमध्ये आयोजित केसीवायएम एर्नाकुलम-अंगमाली मेजर आर्चडायोसीजच्या 67 व्या कार्यकारी वर्षांत ती म्हणाली, “एखादी व्यक्ती ड्रग्जचं सेवन करत असल्याचं मला समजलं, तर त्यांच्यासोबत मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही.”

विंसीच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर तिने तिचा अनुभव सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला. ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कलाकारांसोबत काम करताना सेटवर विंसीला जे अनुभव आले ते धक्कादायक होते. संबंधित चित्रपट किंवा अभिनेत्याचं नाव न घेतला विंसी म्हणाली, “एका चित्रपटात काम करताना मला मुख्य अभिनेत्यासोबत हा अनुभव आला. त्याने ड्रग्जची नशा केली होती आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने तो माझ्याशी वागला होता. त्यामुळे त्याच्यासोबत पुढे काम करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. जेव्हा माझ्या ड्रेसची समस्या होती आणि मला ते दुरुस्त करायचं होतं. तेव्हा त्याला माझ्यासोबत यायचं होतं. “मी तुला तयार व्हायला मदत करतो”, असं तो सेटवर सर्वांसमोर म्हणाला. त्यानंतर सेटवरील वातावरण खूप अन्कम्फर्टेबल झालं होतं.”

“एका सीनच्या सरावादरम्यान त्याच्या तोंडातून काहीतरी पांढरा पदार्थ टेबलावर पडला होता. त्यामुळे तो सेटवर ड्रग्जचं सेवन करत होता, हे स्पष्ट झालं होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे सेटवरील अनेकांसाठी समस्या निर्माण झाली होती. खासगी आयुष्यात ड्रग्ज वापरणं ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा त्या गोष्टींचा तुमच्या कामावर आणि कामावरील इतर माणसांवर परिणाम होतो, तेव्हा ते अस्वीकार्य आहे”, असं विंसीने स्पष्ट केलं.

अशा घटनांमुळेच कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं म्हणून तिने ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांसोबत काम करणार नसल्याचं म्हटलंय. “मला अशा पद्धतीने काम करायचं नाही. एखाद्याला आपल्या वागण्याने इतरांवर काय परिणाम होतोय याचीही जाणीव नसेल, तर त्या व्यक्तीसोबत मला काम करायचं नाही. हा निर्णय मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून घेतला आहे”, असं विंसी पुढे म्हणाली.