महाभारतातील ‘दुर्योधना’ची 13 लाखांची फसवणूक; आरोपीने ई-मेल हॅक करून केला प्लॅन
'महाभारत' फेम पुनीत इस्सार यांची फसवणूक; ई-मेल हॅक करणारा अटकेत
मुंबई: सेलिब्रिटींच्या नावाने किंवा खुद्द सेलिब्रिटींच्या फसवणुकीची अनेक प्रकरणं आजवर समोर आली आहेत. गेल्या काही कालावधीत ऑनलाइन फसवणुकीची नवनवीन प्रकरणं पहायला मिळत आहेत. अशातच ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेते पुनीत इस्सार यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुनीत यांचा ई-मेल अकाऊंट हॅक करून लाखो रुपये आपल्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्याचा आरोपीचा हेतू होता. याप्रकरणी तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
ओशिवरा पोलिसांनी शनिवारी याप्रकरणी आरोपीला अटक केली. या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीने पुनीत इस्सार यांची 13.76 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
पुनीत यांचा दक्षिण मुंबई एक शो आयोजित करण्यात आला होता. आरोपीने त्यांचा ई-मेल हॅक करून शोच्या बुकिंगद्वारे मिळालेले 13.76 लाख रुपये बळकावण्याचा प्रयत्न केला.
पुनीत यांनी काही कामानिमित्त जेव्हा त्यांचा ई-मेल अकाऊंट उघडला, तेव्हा त्यांना काही मेल गायब झाल्याचे दिसले. हे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
View this post on Instagram
‘तपासादरम्यान आम्ही पुनीत इस्सार यांच्या जय श्री राम – रामायण हा शो रद्द झाल्याविषयी एनसीपीएकडे आधी चौकशी केली. त्यानंतर एका बँक अकाऊंटमध्ये 13.76 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती मिळवली. त्याच्या आधारे आम्ही उत्तर मुंबईतील मालवणी परिसरातून आरोपीला अटक केली’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एखाद्या सेलिब्रिटीची अशा पद्धतीने ऑनलाइन फसवणूक झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. पुनीत इस्सार हे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात झळकले होते. ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले.