मणिपूर | 20 जुलै 2023 : 3 मे पासून होत असलेल्या हिंसाचारात मणिपूरमधल्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. तर अनेकांना घर सोडून जावं लागलं. मणिपूरमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. अशातच तिथला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय क्षेत्रातील विविध नेतेमंडळी तसंच बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी या हिंसाचाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावर आता अभिनेत्री उर्फी जावेदचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
आपल्या चित्रविचित्र फॅशनसोबतच उर्फी तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. अनेकदा चालू घडामोडींवर ती तिची मनं बिनधास्तपणे मांडताना दिसते. मणिपूरमधल्या हिंसाचाराबद्दल तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. घटनेविषयीची एक पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, ‘मणिपूरमध्ये जे काही घडलं ते फक्त मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी लज्जास्पद आहे.’ उर्फीशिवाय या प्रकरणी अक्षय कुमार, मीरा चोप्रा, वीर दास, कमाल आर. खान यांसारख्या सेलिब्रिटींनीही ट्विट करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलांवर लैंगिक अत्याचारसुद्धा करण्यात आला होता. हा व्हिडीओ 4 मे रोजी घडलेल्या घटनेचा आहे. ज्यात पोलिसांनी याआधीच एफआयआर दाखल केला होता. मात्र आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नव्हती. बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या व्हायरल व्हिडीओवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, “हे मान्य नाही. जे व्हिडीओ समोर आले आहेत ते अत्यंत चिंताजनक आहेत. याप्रकरणी मे महिन्यातच कारवाई व्हायला हवी होती. अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
‘मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो. दोषींना इतकी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असं भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही अशी मी अपेक्षा करतो’, असं ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.