मनीषा कोईरालाचा डेटिंग लाइफबद्दल खुलासा; म्हणाली “कोण म्हणतं की माझ्या आयुष्यात..”
अभिनेत्री मनीषा कोईराला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 54 वर्षीय मनीषा कोणाला डेट करतेय, या प्रश्नाचंही उत्तर या मुलाखतीतून मिळालं.
अभिनेत्री मनीषा कोईरालाने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सौंदर्य आणि चित्रपटांमुळे मनीषा कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास चाहतेही उत्सुक असतात. वयाच्या 54 व्या वर्षी मनीषा कोणाला डेट करत आहेत का, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी असंख्य चाहते आतूर आहेत. मनीषा तिच्या खासगी आयुष्याविषयी सहसा मोकळेपणे व्यक्त होत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पार्टनरबद्दलच्या प्रश्नाचं बिनधास्तपणे उत्तर दिलंय.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मनीषा कोईरालाला विचारलं गेलं की, आयुष्यात जोडीदार नसल्याने एकटेपणा जाणवतो का? यावर उत्तर देताना ती पटकन म्हणाली, “कोणी म्हटलंय की माझ्याजवळ जोडीदार नाही?” अशी प्रतिक्रिया देऊन मनीषा हसते. याविषयी ती पुढे म्हणाली, “याचं उत्तर मी हो आणि नाही असं देईन. कारण मी जशी आहे आणि माझं आयुष्य आता जसं आहे, त्यात मी खुश आहे. जर माझ्या आयुष्यात एखाद्याला यायचं असेल तर मला कोणत्याही बाबतीत तडजोड करायचं नाहीये. ज्या क्वालिटीचं आयुष्य मी सध्या जगतेय, ते मला सोडायचं नाहीये. त्यात जर एखादी व्यक्ती आणखी चांगल्या गोष्टी आणत असेल आणि सोबत चालायला तयार असेल तर मी खुशच होईन. पण सध्या माझ्याकडे जे आहे, ते मला बदलायचं नाही.”
View this post on Instagram
या अपेक्षेमुळे आयुष्यात जोडीदार येण्यास अडचण होतेय का असं विचारलं असता मनीषाने सांगितलं, “माझ्या आयुष्यात एखाद्याला यायचं असेल तर तो कसाही येईल. या गोष्टी एकमेकांशी सुसंगत आहेत. त्यामुळे मी माझा जोडीदार शोधण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीये. कारण माझं आयुष्य सध्या परिपूर्ण आहे. मी सध्या खूप चांगलं आयुष्य जगतेय आणि पुढेही असंच जगण्याचा प्रयत्न करेन. या आयुष्यातून मला माझं स्वातंत्र्य, निवडीची जाणीव आणि समाधान मिळतंय.”
मनीषा कोईरालाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने 2010 मध्ये नेपाळी बिझनेसमनशी लग्न केलं होतं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आजही पहायला मिळतील. मात्र मनीषाला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिच्या पतीने घटस्फोट घेतला. मनीषाने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी तिने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं.