इथे लोकांचा जीव जातोय अन् ही नाचतेय..; मन्नारा चोप्राचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
सोमवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस पडला. त्यात घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यात दहाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला. अशातच अभिनेत्री मन्नारा चोप्राने सोशल मीडियावर डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर नेटकरी भडकले.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी वळिवाच्या सरींनी वादळी वाऱ्यांसह हजेरी लावली. या पहिल्याच पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. त्यातच घाटकोपर इथं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महाकाय लोखंडी होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडलं. 140 बाय 140 चौरस फुटांचं हे होर्डिंग क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहनं आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. वळिवाच्या पावसामुळे ही मोठी दुर्घटना घडली असताना सोशल मीडियावरील काही सेलिब्रिटींनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ‘बिग बॉस 17’ फेम मन्नारा चोप्राने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावरून अनेकांनी टीका केली आहे. एकीकडे लोकांचा मृत्यू होत असताना अशा पद्धतीने डान्सचे व्हिडीओ पोस्ट करणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओेमध्ये मन्नारा ही एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये नाचताना दिसतेय. इतकंच नव्हे तर ती बाल्कनीच्या रेलिंगवर चढूनही डान्स करताना दिसते. यामुळे नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. ‘होर्डिंग कोसळतायत, लोक दुखापतग्रस्त होतायत, काहींनी आपले प्राण गमावले आहेत आणि तुझ्यासारख्या मेंदू नसलेल्यांना अशा परिस्थितीतही रिल बनवायची आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘इथे परिस्थिती काय आहे आणि ही निर्लज्जासारखी नाचतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘यांना खरंच काही लाज नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी मन्नाराला फटकारलं आहे. त्याचप्रमाणे रेलिंगवर चढून अशा पद्धतीचे स्टंट्स करणं जीवघेणं ठरू शकतं, असंही काहींनी म्हटलंय.
View this post on Instagram
मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे. बिग बॉसच्या सतराव्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि टॉप 5 पर्यंत ती पोहोचली होती. मन्नारा सध्या तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारतेय. गेल्यावर्षी ती ‘भूतमेट’ या वेब सीरिजमध्येही झळकली होती.