भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मनोज कुमार हे देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. एकेकाळी भारत सरकारविरोधात खटला जिंकणारे ते एकमेव कलाकार होते.

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट करणारे मनोज कुमार त्यांच्या तत्त्वांवर ठाम राहणारे होते. मोठ्या पडद्यावर त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या होत्या. आपल्या चित्रपटांद्वारे त्यांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. देशभक्तीपर चित्रपट बनवणारे ते पहिले बॉलिवूड अभिनेते बनले. आज 4 एप्रिल रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांच्या धाडसी वृत्तीचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक किस्सा इंदिरा गांधी यांच्यासोबतच्या वादाचा आहे. मनोज कुमार आणि इंदिरा गांधी यांच्यात आणीबाणीच्या घोषणेनंतर हा वाद झाला होता. यावेळी दोघं एकमेकांसमोर उभे राहिले होते. सुरुवातीला काळात मनोज कुमार आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात सर्वकाही ठीक होतं. परंतु आणीबाणीची घोषणा होताच दोघांमध्ये बरंच काही बदललं. मनोज कुमार यांनी खुलेपणाने आणीबाणीचा विरोध केला होता. असं म्हटलं जातं की आणीबाणीला विरोध करणाऱ्या चित्रपट कलाकारांवर इतकी बंदी घालण्यात आली होती की त्यांचे चित्रपट प्रदर्शित होताच त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.
असंच काहीसं मनोज कुमार यांच्या ‘दस नंबरी’ या चित्रपटासोबत घडलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. त्यानंतर ‘शोर’ हा चित्रपटसुद्धा अशाच प्रकारच्या घटनेला सामोरं गेल्यानंतर प्रदर्शित झाला होता. ‘शोर’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मनोज कुमार होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो दूरदर्शनवर दाखवण्यात आला होता, ज्यामुळे थिएटरमध्ये त्याची कमाई होऊ शकली नव्हती. यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं होतं.




अखेर मनोज कुमार यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यांनी कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला. अनेक आठवडे त्यांनी कोर्टात पायपीट केली. परंतु याचा फायदा त्यांना झाला आणि कोर्टाने मनोज कुमार यांच्या बाजूने निकाल दिला. भारत सरकारविरोधात खटला जिंकणारे हे एकमेव कलाकार होते. या खटल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना ‘आणीबाणी’वर चित्रपट बनवण्याची ऑफर दिली. परंतु मनोज कुमार यांनी ही ऑफर नाकारली होती. या चित्रपटाची पटकथा अमृता प्रीतम लिहित होत्या आणि तो एक डॉक्युमेंट्री चित्रपट होता. जेव्हा मनोज कुमार यांना याबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी अमृता प्रीतम यांना खूप सुनावलं होतं. नंतर हा चित्रपट कधीच बनू शकला नव्हता.