चोराच्या उलट्या बोंबा.. स्वत:च आक्षेपार्ह टिप्पणी करून कोर्टात घेतली धाव; अभिनेत्याचा उलटला डाव
मंसूर यांच्या टिप्पणीनंतर भविष्यात कधीच त्यांच्यासोबत काम करणार नसल्याचा निर्णय तृषाने घेतला. आधी मंसूर यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता. जेव्हा सेशन कोर्टात त्यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेला फेटाळण्यात आलं, तेव्हा त्यांनी माफी मागितली.
चेन्नई : 12 डिसेंबर 2023 | ‘लियो’ या दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारलेले अभिनेते मंसूर अली खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने मंसूर यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका करण्यात आली होती. आता मद्रास उच्च न्यायालयानेही मंसूर अली खान यांना फटकारलं आहे. तृषा, मेगास्टार चिरंजीवी आणि खुशबू सुंदर यांच्यावर 1 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना फटकारलं आहे. “तृषाबद्दल मी केलेल्या वक्तव्याची योग्य पडताळणी न करता सार्वजनिकरित्या तिघांनी माझ्याबद्दल अपमानकारक वक्तव्ये केली आहेत,” असा आरोप त्यांनी याचिकेत केला.
कोर्टाने मंसूर यांनाच फटकारलं
तृषाने मानहानीचा दावा करण्याऐवजी मंसूर अली खान तसा दावा का करत आहेत, असा प्रश्न सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एन. सतीश कुमार यांना पडला. “अटकेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी बिनशर्त माफी मागितली होती का? खरंतर तृषाने कोर्टात धाव घ्यायला पाहिजे होती. कोणत्या आधारावर मंसूर यांनी कोर्टात दाद मागितली आहे”, असा सवाल कोर्टाने केला. इतकंच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने कसं वागावं याबद्दल सल्ला देण्याची विनंती न्यायमूर्तींनी त्यांच्या वकिलांना केली. कोर्टाने याप्रकरणी तृषा, चिरंजीवी आणि खुशबू या तिघांनाही उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
मंसूर यांचा दावा
दुसरीकडे मंसूर यांनी कोर्टात निर्दोष असल्याचा दावा सतत केला. “मी वैयक्तिकरित्या कोणत्याही व्यक्तीविरोधात काहीच चुकीचं बोललो नाही. मी फक्त यापूर्वी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांबद्दल भाष्य करत होतो. मी साकारलेली काही दृश्ये आता सर्वसामान्य राहिली नाहीत, हे मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो. मी तृषा किंवा कोणत्याही महिलेबद्दल वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र न्यायाधीशांनी मंसूर यांच्यावर सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याची टीका केली.
सुनावणी महिन्याच्या अखेरपर्यंत तहकूब
मंसूर यांच्या वकिलाने त्यांच्या अनकट मुलाखतीचे फुटेज कोर्टात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी 22 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचसोबत याप्रकरणी तृषा, चिरंजीवी आणि खुशबू सुंदर यांचं म्हणणं काय आहे, तेसुद्धा कोर्टात सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
मंसूर अली खान यांना तृषासोबत चित्रपटात एक सीन करायचा होता. याविषयी ते म्हणाले, “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायलासुद्धा दिलं गेलं नाही.”