आम्ही चुकलो..; विनेश फोगटसाठी भाजपात गेलेल्या मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
कुस्तीगीर विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरली. फायनल्सपूर्वी काही ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेशने जेव्हा उपांत्य फेरीत विजय मिळवला होता, तेव्हा एका मराठी अभिनेत्याने तिच्यासाठी पोस्ट लिहिली होती.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कुस्तीगीर विनेश फोगाटने 5-0 अशा गुणांनी विजय मिळवल्यानंतर अंतिम सामन्यापूर्वी तिचं अपात्र घोषित होणं अनेकांच्या जिव्हारी लागलंय. अवघ्या काही ग्रॅम्सने वजन जास्त भरल्याने ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमांनुसार विनेशला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. असं असलं तरी ऑलिम्पिक स्पर्धेतील विनेशची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. गेल्या वर्षी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केलं आहे. कुस्तीपटूंनी या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन आणि निदर्शनं केली होती. या आंदोलनात विनेशचाही सहभाग होता. त्यावेळी तिने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. याच घटनांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत आता भाजपात गेलेल्या एका मराठी अभिनेत्याने विनेशसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट अभिनेता अभिजीत केळकरने लिहिली आहे. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर त्याने ही पोस्ट लिहिली होती.
अभिजीत केळकरची पोस्ट-
‘आम्ही चुकलो… मानवनिर्मित देवदेवतांची पूजा करत राहिलो. तुझ्यातल्या स्त्रीत्वाला पायदळी तुडवलं, तुझ्यावर अत्याचार केले. पण तू हरली नाहीस. खरंतर तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही. तुझ्यातल्या स्त्रीशक्तीला साष्टांग दंडवत,’ असं ट्विट अभिजीतने केलं आहे.
View this post on Instagram
ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई अजिंक्यपद यांसह देशविदेशातील असंख्य स्पर्धांमध्ये मेडल्स पटकावणारे कुस्तीपटू राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी विनेश फोगटने रडत रडत सांगितलं होतं, “राष्ट्रीय शिबिरात ब्रज भूषण आणि प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात. आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात. आम्हाला त्रास देतात. माझा इतका मानसिक छळ करण्यात आला की मी एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे.”
पहिल्या 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 48 किलो वजनी गटातून खेळताना विनेशला दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2020 टोक्यो स्पर्धेत विनेश 53 किलो वजनी गटात नवव्या स्थानावर राहिली होती. मानसिक दडपण आणि स्पर्धेदरम्यान झालेल्या अंतर्गत कलहाचा विनेशच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. यंदा तयारीपासूनच विनेशला संघर्ष करावा लागला होता. मॅटबाहेरील अस्तित्वाची लढाई लढत असतानाच विनेशसमोर वजनी गट बदलावं लागल्याचंही आव्हान होतं.