रोज ऑडिशन देतोय, पण हा झापुक झुपूक बोलून..; सूरज जिंकल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता ठरल्यानंतर एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. रोज ऑडिशन देऊनही मुख्य भूमिका मिळत नसल्याची खंत या अभिनेत्याने बोलून दाखवली आहे,
बारामतीतल्या सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद पटकावलंय. रविवारी 6 ऑक्टोबर रोजी शोचा ग्रँड फिनाले पार पडला. टॉप 6 स्पर्धक बिग बॉसच्या घरात होते. त्यापैकी जान्हवी किल्लेकर आधीच 9 लाख रुपयांचं सुटकेस घेऊन खेळातून बाहेर पडली. त्यानंतर अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि सूरज सावंत यांच्यात अंतिम चुरस रंगली होती. त्यात सूरजने बाजी मारली. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजचं अनेकांकडून कौतुक होत आहे. ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता जाहीर करताना ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे हेड्सदेखील तिथेच उपस्थित होते. तेव्हा प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असल्याचं त्यांनी सांगितलं. सूरज विजेता ठरल्यानंतर आणि त्याला चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर आता एका मराठी अभिनेत्याने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता कपिल होनरावने सूरज जिंकल्यानंतर ही पोस्ट लिहिली आहे. स्वत:च्या ऑडिशनचे व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, ’10 वर्षे प्रायोगिक थिएटर, साडेतीन वर्षे टॉपचे सीरिअल करून, स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करून, सिक्स पॅक ॲब्स, अभिनयावर काम करून, इतके रोज ऑडिशन देतोय.. एक लीडचा ऑडिशन क्रॅक नाही होत. पण हा झापुक झुपुक बोलून बिग बॉसची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव. अभिनंदन सूरज.. झापुक झुपुक शुभेच्छा, गोलीगत शुभेच्छा भावा, खुप पुढे जा.’
View this post on Instagram
कपिलच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ’99 टक्के मेहनत करणं जसं आवश्यक असतं तसंच त्याच्या जोडीने 1 टक्का नशीबाची साथ पण असावी लागते’, असं एकाने लिहिलंय, तर ‘जसा कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो, तसाच तो एक. त्यानं जसं जमेल तसं सोशल मीडियावर आणि बिग बॉसच्या घरात स्वतःला प्रेजेंट केलं आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं आणि तो जिंकला. आता याला तुम्ही नशीब म्हणा किंवा सिम्पथी.. पण तो जिंकला त्यामुळे आम्ही खुश आहोत,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.