मुघलांना महाराजांच्या खबरा देणाऱ्या गद्दाराच्या भूमिकेत संतोष जुवेकर; मी त्याल रंगेहाथ… किरण मानेंकडून पोलखल
किरण माने यांनी ही पोस्ट सहज एक आठवण असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या या पोस्टचा संदर्भ संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाशी निगडीत असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या या पोस्टवर नेहमीप्रमाणे कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले. याच चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले, त्यामध्ये अभिनेता संतोष जुवेकरनेही एक भूमिका केली होती. रायाजी या त्याच्या पात्राचं बरंच कौतुकही झालं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या अनेक कलाकारांच्या मुलाखती घेण्यात असून काही दिवसांपूर्वी संतोष जुवेकरनेही एका मुलाखतीत या चित्रपटाचा अनुभव सांगत काही किस्सेही शेअर केले होते. मात्र तेव्हाच त्याने केलेल्या एका विधानाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘छावा’ मध्ये विकी कौशलची प्रमुख भूमिका असून तर रश्मिका मंदाना येसुबाईंच्या भूमिकेत दिसली. आणि क्रूरकर्मा, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता अक्षय खन्ना दिसला. याचसंदर्भात संतोष जुवेकरने एक वक्तव्य केलं, ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असं संतोष जुवेकर मुलाखतीत म्हणाला होता. मात्र त्यावरून त्याल बरंच ट्रोलही करण्यात आलं. त्याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती.‘आपला रोल किती आणि आपण बोलतो किती. किती अतिशयोक्ती… ‘ असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली होती.
किरण मानेंनी एका पोस्टमध्येच उघडं पाडलं…
संतोष जुवेकरच्या या विधानानंतर बराच गहजब उडाला, त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. याच दरम्यान अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया साईटवरील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून किरण माने यांनी एक फोटो पोस्ट करत आठवणही शेअर केली आहे.या पोस्टमध्ये त्यांनी ‘रावरंभा’ या चित्रपटातील एका क्षणावर भाष्य केलं आणि त्यासोबत फोटोही जोडला, विशेष म्हणजे त्या पोस्टमध्ये चक्क संतोष जुवेकर हाच दिसत आहे.
” मी ‘रावरंभा’ नांवाच्या सिनेमात ‘हकीमचाचा’ ही छ. शिवरायांशी एकनिष्ठ असलेल्या मुस्लिम गुप्तहेराची भुमिका केली होती ! त्या सिनेमामध्ये संतोष जुवेकर हा मुघल बादशहांना राजांच्या खबरी देणार्या गद्दार मावळ्याच्या भुमिकेत होता… त्या सिनेमात मी त्याला रंगेहाथ पकडतो तो क्षण ! सहज एक आठवण…” असं किरण माने यांनी त्यामध्ये लिहीलं आहे.
View this post on Instagram
किरण माने यांनी ही पोस्ट सहज एक आठवण असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या या पोस्टचा संदर्भ संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाशी निगडीत असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या या पोस्टवर नेहमीप्रमाणे कमेंट्सचा पाऊस पडला असून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘ ये लग SIXER !!!!! बॉल स्टेडियमच्या बाहेर मारलात’ ‘अगदी शाल पांघरून पद्धतशीर कार्यक्रम केलात किरण दादा’ असं लिहीत नेटीझन्सनी मानेंच्या पोस्टचं कौतुक करत संतोष जुवेकरला पुन्हा टोला मारला आहे.
काय होतं संतोष जुवेकर याचं विधान ?
संतोष जुवेकरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती, या मुलाखतीमध्ये त्याने शुटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी तो म्हणाला, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंही नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.” अस विधान संतोष जुवेकरने केलं होतं.