कॉफी सिनेमा: कॉफी दिवसाची फ्रेश सुरुवात करते, कॉफीमुळे मूड फ्रेश करते. तसंच या वर्षाची सुरुवात अशाच फ्रेश सिनेमाने होतेय. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा कॉफी हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे १४ जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमात प्रेमाचा ट्रँगल दाखवण्यात आलाय. स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, आणि कश्यप परुळेकर हे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत.
कॉफी या मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. आणि १४ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. तन्वी फिल्म्सचा हा सिनेमा नितीन कांबळे यांनी दिग्दर्शित केलाय. लॉकडाऊननंतर मराठी चित्रपट तेजीत आहेत. मराठी सिनेमांना प्रेक्षक चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेल्या झिम्मा या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. पांडू सिनेमाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या वर्षाची सुरूवात ‘कॉफी’ने होतेय. त्यामुळे मराठी सिनेमांसाठी हे वर्ष फ्रेश असणार, असं म्हणायला हरकत नाही.
स्पृहा जोशीने या आधीही उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. लॉस्ट अॅण्ड फाउंड, होम स्वीट होम, अ पेईंग घोस्ट, देवा आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही ही काही तिच्या निवडक सिनेमांची नावं आहेत. तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात. सिनेमांसोबतच तिच्या कविताही वाचकांना आपल्याश्या वाटतात.
सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहाने लॉस्ट अॅण्ड फाउंड या चित्रपटात एकत्र काम केलंय. तसंच क्लासमेट, झिम्मा, गुलाबजाम, ऑनलाईन बिनलाईन अशा अनेक चित्रपटांमधून सिद्धार्थ मोठ्या पडद्यावर झळकलाय. स्पृहा आणि सिद्धार्थचा कॉफी सिनेमा परवा प्रदर्शित होतोय. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या