Dharmaveer: आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं..; ‘धर्मवीर’ साकारणाऱ्या प्रसाद ओकसाठी ‘अनिरुद्ध’ची खास पोस्ट
या चित्रपटाची आणि प्रसादच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र होत असतानाच आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक-समिक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची आणि प्रसादच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र होत असतानाच आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी खास पोस्ट लिहिली आहे. जवळपास वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मिलिंद आणि प्रसाद यांनी ‘अथांग’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. प्रसादचा तिथपासूनचा प्रवास कसा होता त्याबद्दल मिलिंद यांनी पोस्टमध्ये लिहित त्याच्या कामाचं कौतुक केलं. मिलिंद यांनी लिहिलेल्या या पोस्टवर प्रसादनेही प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट-
‘प्रसाद ओक तुझं खूप खूप कौतुक, तुझं खूप खूप अभिनंदन. वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण दोघांनी केलेल्या ‘अथांग’ नावाच्या सिरीयलपासून ते आता धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या भूमिकेपर्यंतचा तुझा प्रवास मी पाहिला आहे. खूपच कौतुकास्पद, यशस्वी आहे तो, प्रेरणादायीसुद्धा. आपला मित्र इतकं कसं छान काम करतो, याचा अभिमान वाटतो. दिग्दर्शन असो किंवा अभिनय असो तू अप्रतिमच काम करतोस. मागच्या आठवड्यात चंद्रमुखी पाहिला. इतका अप्रतिम सिनेमा फार दिवसात बघितला नव्हता आणि आता तर काय धर्मवीर सिनेमा उद्या रिलीज होतोय. पण तो रिलीज व्हायच्याआधीच सुपर-डुपर हिट झालाय असं तू समजच. कारण आनंद दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं होतं. आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं, आदर्श कोणाला मानावं तर आनंद दिघे साहेब हे उत्तम उदाहरण आहेत आणि तू हुबेहूब आनंद दिघे साहेबांचा सारखा दिसला आहेस (अभिनेता बेन किंग्स्ले गांधी चित्रपटात दिसला तसा). तुझ्या अभिनयाची उंची मला माहिती आहे, त्यामुळे सिनेमा अप्रतिमच असणारच, खूप खूप खूप शुभेच्छा मित्रा. माझे मित्र प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई तुमचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, हा विषय निवडला आणि त्याला तुम्ही न्याय दिलात. धर्मवीरच्या संपूर्ण टीमला माझा सलाम आणि शुभेच्छा,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली.
पहा पोस्ट-
View this post on Instagram
प्रसाद ओकची प्रतिक्रिया
‘मित्रा.. किती गोड आहेस यार तू. आजकाल कोण कुणाचं असं दिलखुलास कौतुक करतं का? पण तू पहिल्यापासूनच असा सच्चा आहेस. म्हणूनच वर्षानुवर्षे आपण भेटलो नाही तरी आपल्यातली मैत्री शुद्ध आहे, निर्मळ आहे तुझ्यासारखीच. खूप आभार मिलिंद आणि खूप खूप खूप प्रेम. चित्रपट पाहिलास कि नक्की बोलू आपण,’ अशी प्रतिक्रिया प्रसादने या पोस्टवर दिली.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे. तर एकनाथ शिंदेंची भूमिका क्षितिज दाते साकारणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत.