Pradeep Patwardhan: “कलाकाराचं ग्लॅमर संपल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला विसरू नये”; प्रदीप पटवर्धन यांचे भावूक उद्गार
प्रदीप पटवर्धन यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी कलाकारांविषयी भावनिक मत व्यक्त केलं होतं.
“एखाद्या नटाचं ग्लॅमर संपल्यावर प्रेक्षकांनी त्याला विसरू नये, कारण त्या नटाने आयुष्यभर कलेची साधना केलेली असते”, असे भावूक उद्गार अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांनी एका मुलाखतीत काढले होते. अभिनेत्याचा चेहराच सगळं काही नसतो तर त्याचं काम प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं, असंही ते यावेळी म्हणाले होते. वयाच्या 52व्या वर्षी प्रदीप पटवर्धन यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या (Mumbai) राहत्या घरी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी (Marathi Industry) आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रदीप पटवर्धन यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी कलाकारांविषयी भावनिक मत व्यक्त केलं होतं.
‘दिव्य मराठी’ला दिलेल्या या मुलाखतीत ते म्हणाले, “आयुष्याच्या संध्याकाळी कधी एखादा कलाकार भेटल्यास त्याच्याशी तेवढ्याच अदबीनं बोलावं. कारण तीच त्याच्या आयुष्याची पुंजी असते.” यावेळी त्यांनी मालिकांविषयीही आपलं मत व्यक्त केलं होतं. रडक्या मालिकांच्या गर्दीत विनोदी मालिकांची खरी गरज आहे, असं ते म्हणाले होते. “काही मालिका आठ ते दहा वर्षे चालवल्या जातात. वास्तविकतेपासून कोसो दूर असलेल्या या मालिका प्रेक्षकसुद्धा मन लावून बघतात याचं आश्चर्य वाटतं”, अशा शब्दांत त्यांनी आपले विचार मांडले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला शोक
मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे. pic.twitter.com/CVjESFYCkf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 9, 2022
‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या विनोदी मालिकेनं आपल्याला खूप मोठं यश दिल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. “दर्जेदार विनोदी मालिका असल्याने प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. पूर्वी वाहिन्या नसल्याने रसिक कलाकाराला बघायला थिएटरमध्ये येत असत. आता कलाकारांबाबत हा गोडवा संपला आहे”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.