मुंबई : गणपती बाप्पाचं (Ganpati 2021) जंगी स्वागत करून आता 2 वर्ष उलटली. काही अंशी आपण अजूनही एका विळख्यात अडकलो आहोत, जगातली संकटं कमी होण्याचं नावही घेत नाहीयेत आणि आयुष्यात नकारार्थी विचारांची सुद्धा सहज मैफिल सजते आहे. आता ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर बाप्पाच देऊ शकतो.
संकटकाळात देवाकडे शुद्ध मनाने हाक मारली की देव ऐकतो असं म्हणतात. म्हणूनच ह्या पिढीतील लहानग्या मुलामुलींची गणरायाला मारलेली सुरेल आणि निरागस हाक नक्की गजानानापर्यंत पोचेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. हीच आशा कायम ठेऊन हे नवीन गाणं प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आलं आहे, चिमुकल्यांच्या मोहक आवाजात गणरायाला घातलेलं हे साकडं!
संगीतकार धनश्री गणात्रा ह्यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुरेख गाणं लिहिलं आहे गीतकार आदित्य महाजन ह्याने. ह्या गाण्याची विशेषता अशी आहे की ह्यात काही प्रचलित आरत्या आणि श्लोकांचे एक वेगळे आणि नवीन स्वरूप तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. गाण्याची शब्दरचना आणि सांगीतिक रचना अशी केली गेली आहे की ते गाणं गुणगुणावंसं आणि पाठ करावंसं वाटावं. आर्य फडके, नील कानेटकर, शर्वरी देवधर आणि बेला कुलकर्णी ह्या बालगायकांनी ह्या गाण्याला स्वर दिले आहेत. गाण्याच्या व्हिडिओचं काम आदित्य महाजन ह्यांनीच केले आहे तर त्यात वापरलेल्या सुंदर गणपती उत्सवातील व्हिडीओजचं छायाचित्रीकरण अनिकेत शिंदे ह्यांनी केले आहे.
“सुखकर्ता दुःखहर्ता”, “घालीन लोटांगण” आणि “मोरया मोरया मी बाळ तान्हे” ह्या तीन सर्वांना तोंडपाठ असलेल्या आरत्या/ श्लोक ह्यांची नवीन शब्दरचना ह्या गाण्यात ऐकायला मिळेल. “घालीन लोटांगण” चे शब्द गणपतीचे कौतुक करणारे घेतले गेले आहेत आणि गाण्यात ह्या ओळींच्या वेळी गाण्याचा टेम्पो वाढवून त्यातून एका वेगळ्या शक्तीची
भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला गेला आहे.
पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि भाऊ रंगारी गणपती ह्यांचे दर्शन गाण्यादर्म्यान व्हिडिओमध्ये होणार आहे. पुण्यातील पंचम स्टुडिओ येथे ह्या गाण्याचे रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगचे पूर्ण काम केले गेले आहे.
“स्मृतिगंध” ह्या नामांकित फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर हे गाणं १० सेप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता प्रसारित होणार आहे, तर तुम्ही ह्या गाण्याचा नक्की आस्वाद घ्या.
संबंधित बातम्या