छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा थरार; पहा अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर
डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'गरुडझेप' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून छत्रपची शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेब दरबारातील प्रसंग, यासोबतच त्यांच चातुर्य, शौर्य पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shiv pratap Garudzep) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की डॉ. कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या तोंडी येतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील ‘गरुडझेप’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या टीझरमध्ये भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच त्यांचे चातुर्य, शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी आहे.
पहा टीझर-
View this post on Instagram
या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, हा प्रसंग साधासुधा नव्हता. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून निसटून महाराज किल्ले राजगडावर पोहोचले होते. सुटकेचा हा थरार, हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे.