टिनपाटच्या डब्यावर ताल शिकले, इराण्याच्या हॉटेलबाहेर गाणं; असे घडले विठ्ठल शिंदे!
एखाद्या क्षेत्रात नावाजलेला व्यक्तीचं आपल्याला यश दिसतं. (Five facts about vitthal shinde everybody must know)
मुंबई: एखाद्या क्षेत्रात नावाजलेला व्यक्तीचं आपल्याला यश दिसतं. पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती खस्ता खाव्या लागतात हे दिसत नाही. गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या बाबतीतही तसेच घडले. त्यांनाही यश मिळालं. पण त्यामागे प्रचंड मोठा संघर्ष होता. या होता हा संघर्ष? त्याचा घेतलेला आढावा. (Five facts about vitthal shinde everybody must know)
एक खोली चार बिऱ्हाडं
चौथी इयत्तेनंतर शिक्षण सोडल्यावर 1943 मध्ये ते आई आणि मामांबरोबर मुंबईत आले. मुंबईत कामाठीपुऱ्यात नवव्या गल्लीत दिना शेठची चाळ आहे. तिथे शिंदे कुटुंबीय भाडोत्री म्हणून राहू लागले. ही 15 बाय 12 रुम होती. या खोलीत पोटमाळाही होता. पण त्या खोलीतच शिंदे यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त तीन भाडोत्री राहत होते. म्हणजे एका खोलीत चार कुटुंबं राहत होती. पण परिस्थितीमुळे त्यांना जुळवून घ्यावं लागत होतं.
टिनपाटवर ठेका शिकले
विठ्ठल शिंदे यांचे दगडू मामा अपंग होते. मुंबईत ट्राम गाडीच्या अपघातात त्यांचा एक हात आणि पाय गेला. तरीही ते भजन-किर्तन करताना उत्कृष्ट तबला वाजवायचे. त्यांनीच विठ्ठल शिंदे यांना ठेके शिकवले. वारकरी सांप्रदायिक ठेका. भजनी ठेका आणि केरवा ताल ठेका त्यांना शिकवण्यात आला. हे ठेके शिकल्यानंतर शिंदेंनी टिनपाटच्या डब्यावर प्रॅक्टिस सुरू केली. नंतर तबला घेतला आणि त्यावर सराव सुरू केला. तबला बऱ्यापैकी शिकल्यानंतर ते मामांना किर्तनात साथ देऊ लागले. त्यावेळी त्यांचं वय असेल अवघ 10 ते 12 वर्षे. त्याचवेळी त्यांना गाण्याचा छंद जडला आणि गाणंही गाऊ लागले.
ईराण्याच्या हॉटेलमधील गाण्याने गोडी लावली
त्याकाळात मुंबईत ईराण्याची हॉटेल भरपूर होते. आता ही हॉटेल्स फार कमी झाली आहेत. पण तेव्हा ईराणी हॉटेल्स सुद्धा मुंबईची ओळख होती. ईराणीबाबा खूप प्रेमळ असायचे. कामाठीपुऱ्यातही ईराणी हॉटेल्स पुष्कळ होती. त्याकाळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ईराणीबाबा हॉटेल्समध्ये ग्रामोफोन रेकॉर्डस् लावायचे. एक आण्याचा चहा पिता पिता भक्तीगीते, भावगीते आणि सिनेमागीते ऐकायला मिळायची. शिवाय वर्तमानपत्रेही फुकट वाचायला मिळायची. या हॉटेलमध्ये गजानन वाटवे, बालगंधर्व, जी.एन. जोशी या त्याकाळातील आघाडीच्या गायकांची गाणी ऐकायला मिळायची. शिंदे ही गाणी ऐकून त्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करू लागले. संगीत विद्यालयात जाण्याची ऐपत नसल्याने ग्रामोफोनवरील गाणी ऐकूनच त्यानुसार गाण्याचा सराव करू लागले. या कामाठीपुऱ्यात रामकिशन नावाचा पानवाला होता. त्याच्या मुलाला संगीत शिकवण्यासाठी गवई येत होता. रस्त्यावरून जाताना या गवयाची शिकवणी कानावर पडायची. त्यामुळे या इमारतीखाली शिंदे शिकवणी संपेपर्यंत उभे राह्यचे आणि गाणं ऐकायचे. पानवाल्याच्या मुलाला जे शिकवलं जाईल, ते ऐकून त्यानुसार नंतर त्यांचा सराव सुरू व्हायचा. या शिकवणीतूनच त्यांना हरकती कशा घ्यायच्या, मुरकती कशा असाव्यात, शब्दफेक कशी करायची आणि गाण्यात गोडवा कसा आणायचा याचा रियाज त्यांनी सुरू केला. त्यानंतर घरी हार्मोनियमवर प्रॅक्टिस सुरू केली. मनानेच पेटीतले स्वर शोधून काढले.
पहिली बिदागी 8 ते 10 रुपये
हार्मोनियम वाजवायला शिकल्यानंतर त्यांनी त्याकाळचे प्रसिद्ध कव्वाल ईस्माईल आझाद, जानी बाबू आणि झनकार कव्वाल यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना प्रत्येक कार्यक्रमानंतर 8 ते 10 रुपये बिदागी मिळायची. कलावंत म्हणून मिळालेली त्यांना ही पहिली बिदागी होती. मुस्लिम कलावंत जातपात मानत नसत. त्यांना बहुतेक साथ संगत करणारे दलित कलावंत असत. या कलावंतांकडून खूप काही शिकता आलं. कव्वाली कशी गावी, आवाज उंच कसा न्यावा, शब्दफेक कशी करावी? हे सर्व या कव्वालांकडून शिकायला मिळालं. त्याचा पुढे संगीतकार म्हणून खूप फायदा झाल्याचं विठ्ठल शिंदे सांगतात.
गाणं सोडलं, काम सुरू
कव्वालांना साथ करून करून कंटाळा आल्यानंतर त्यांनी कव्वालीच्या कार्यक्रमांना जाणं बंद केलं. त्यानंतर त्यांनी नागपाड्यात झेनिथ टिन वर्क कंपनीच्या डब्याच्या कंपनीत नोकरी पत्करली. या कंपनीत ते हातगाडीवर डबे ठेवून हातगाडी ओढायचे. नागपाडा ते डिलाईल रोड हातगाडी ओढून नेल्यावर ते मशीनवर काम करायचे. मशीनवर पत्रे कापताना त्यांच्या हाताला चरे पडू लागले. हात रक्तबंबाळ होऊ लागले. त्यामुळे त्यांना पेटी वाजवणे कठिण होऊन गेले. दोन महिने कंपनीत काढल्यानंतर त्यांनी हे कामही सोडून दिलं. नंतर त्यांनी गजानन वाटवे आणि जी. एन. जोशी यांची आणि सिनेमाची अशी 20-22 गाणी पाठ केली. तीही ईराणी हॉटेलात बसूनच. त्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेत त्यांनी स्वत:हून गायला सुरुवात केली. त्यांना प्रतिसादही मिळू लागला आणि बिदागीही. शिवाय त्यांना कार्यक्रमही मिळू लागले.
अन् रेडिओ बंद व्हायचा
शिंदे यांच्या घरासमोर राहणाऱ्या एका माणसाच्या घरी रेडिओ होता. तो नेहमी गाणं लावायचा. त्यामुळे शिंदे त्यांच्या खिडकीखाली जाऊन गाणं ऐकायचे. हे पाहून तो माणूस रेडिओ बंद करायचा. असं सातत्याने व्हायचं. त्यामुळे शिंदे चिडायचे. आपण कधी रेडिओवर गाऊ असं त्यांना वाटायचं. योगायोगाने ही संधी त्यांना आयतीच चालून आली. 1952मध्ये आकाशवाणीवरील कामगार विभागाचे प्रभाकर शिंदे यांनी विठ्ठल शिंदेंना गायनाची संधी दिली आणि त्यांच्या गायकीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. त्यांनी आकाशवाणीवर भावगीत आणि अभंग गायले होते. ती गाणी ही होती…
आता माझी चिंता तुज नारायण, रुक्मिणी रमण वासुदेवा !!!
किंवा
राधिके तुला नाही बरा हा छंद, कसा गं तुला आवडला गोविंद… !!! (साभार, आंबेडकरी कलावंत) (Five facts about vitthal shinde everybody must know)
संबंधित बातम्या:
‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!
विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!
लतादीदींनी गाणं थांबवलं, धीर दिला अन्…; वाचा, गायक विठ्ठल शिंदेंनी सांगितलेला किस्सा!
वाचता येत नव्हतं, तरीही ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?
(Five facts about vitthal shinde everybody must know)