मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिचा आज 46 वा वाढदिवस आहे. मूळची पुण्याची असलेल्या सोनाली कुलकर्णीने गिरीश कर्नाड यांच्या ‘चेलुवी’ या कन्नड चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. सोनालीने आतापर्यंत 7 भाषांमधील तब्बल 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने डझनभर मराठी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.
1992 मध्ये, सोनालीला गिरीश कर्नाड यांच्याकडून ‘चेलुवी’ या कन्नड चित्रपटासाठी अभिनयाची पहिली ऑफर मिळाली होती. गिरीश यांनी जेव्हा तिला ही ऑफर दिली, तेव्हा सोनाली कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिने आधी क्लास चुकण्याच्या भीतीने ती नाकारली ऑफर नाकारली होती. नंतर गिरीश यांनी अनेकदा समजवल्यानंतर तिने होकार दिला होता. सोनालीच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाला केवळ राष्ट्रीय पुरस्कारच मिळाला नाही, तर तो ‘कान’ चित्रपट महोत्सवातही तो प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या यशानंतर सोनालीने कधीही मागे वळून पाहिले नाही. सोनाली कुलकर्णीने मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ, हिंदी तसेच हॉलिवूड आणि इटालियन चित्रपटांमध्ये काम केले.
2006 मध्ये ‘फुओको दी सु’ या इटालियन चित्रपटासाठी तिला ‘मिलान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पुरस्कार मिळाला होता. तिच्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये ‘दिल चाहता है’, ‘सिंघम’ आणि ‘मिशन कश्मीर’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तिने ‘डरना जरुरी है’, ‘दिल-विल प्यार-व्यार’, ‘प्यार तूने क्या किया’ आणि ‘सिंघम’ यांसारख्या हिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कैरी’, ‘घराबहेर’, ‘देवराई’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘सखी’, ‘अग बाई अरेच्चा 2’ आणि ‘देऊळ’ हे तिचे मराठी चित्रपटही सुपरहिट झाले आहेत.
सोनाली कुलकर्णी एका यशस्वी अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी स्तंभलेखिकाही आहे. ती एका प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रासाठी ‘सो कूल’ नावाचा स्तंभ लिहिला आहे. या स्तंभामुळे ती इतकी प्रसिद्ध झाली की, तिला ‘सो कूल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. अभिनेते नाना पाटेकर यांनीही तिच्या लेखांचे कौतुक केले होते.
एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणाऱ्या सोनालीला वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. सोनालीचे पहिले लग्न प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी झाले होते. त्यानंतर घटस्फोट घेत 2010 मध्ये सोनालीने फॉक्स टीव्हीचे एमडी नचिकेत पंतवैद्य यांच्याशी लग्न केले. नचिकेत आणि सोनाली यांना एक मुलगीही आहे.